वाहन विक्री अठरा वर्षाच्या नीचांकावर

जीएसटी दरात कपात करण्याची वाहन उद्योगाची मागणी

नवी दिल्ली – प्रवासी वाहन विक्री मे महिन्यामध्ये 20 टक्‍क्‍यांनी कमी झाली. विक्रीचा हा आकडा अठरा वर्षाच्या नीचांकावर गेला आहे. सरकारने मंदी कमी करण्यासाठी शक्‍य लवकर हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे वाहन उत्पादकानी म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशातील मोठ्या वाहन कंपन्या मागणी कमी असल्यामुळे वाहनांच्या उत्पादनात कपात करीत आहे. मे महिन्यात केवळ 2,39,347 एवढी वाहने वितरकांनी कंपन्याकडून खरेदी केली. गेल्या वर्षी मे महिन्यात ही संख्या 3,01,238 इतकी होती. गेल्या 11 महिन्यांपैकी दहा महिन्यात वाहन विक्री कमी झाली आहे. 2001 नंतर प्रथमच वाहन विक्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सप्टेंबर 2001 मध्ये वाहन विक्री 21.91 टक्‍क्‍यांनी कमी झाली होती.

आता मे महिन्यात ही विक्री वीस टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. विशेष म्हणजे वाहन क्षेत्रातील सर्व प्रकारात म्हणजे दुचाकी, व्यावसायिक वाहने, प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट झाली असल्याचे सियाम या वाहन उत्पादन करणाऱ्या उद्योजकांच्या संघटनेने म्हटले आहे. मे महिन्यात घाऊक कार विक्री 26 टक्‍क्‍यांनी, मोटरसायकल विक्री पाच टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सीआमचे महाव्यवस्थापक विष्णू माथूर यांनी सांगितले की, वाहनांची विक्री कमी होत असल्यामुळे वाहन कंपन्या वाहनांचे उत्पादन कमी करू लागल्या आहेत. या अगोदर 2011 आणि 2009 मध्ये केंद्र सरकारने अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा उत्पादन शुल्कात कपात करून या क्षेत्राला मदत केली होती. सध्या वाहनावर 28 टक्‍के जीएसटी लागतो तो कमी करून 18% करण्याची या क्षेत्राची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर जुन्या वाहनाबाबत सरकारने धोरण जाहीर करावे असेही त्यांनी सांगितले. वाहन उद्योग बीएस 6 प्रकारची वाहने निर्माण करण्यासाठी या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करीत असतानाच वाहन विक्री झपाट्याने कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)