#CWC19 : ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर दमदार विजय

लंडन – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघात शनिवारी रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने न्यूझीलंडवर तब्बल 86 धावांनी मात दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांमध्ये 9 बाद 243 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाला केवळ 157 धावाच करता आल्या. उस्मान ख्वाजाच्या 88 धावा आणि कॅरेच्या 71 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अडीचशे धावांचा टप्पा गाठला होता. मात्र वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी करणारा न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियासमोर पूर्णपणे ढेपाळला. यावेळी स्टार्कने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला.

244 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. हेन्री निकोलास आणि मार्टीन गुप्टील हे सलामीवीर बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये 55 धावांची अर्धशतकी भागीदारीही झाली. मात्र, स्टार्कने कर्णधार विल्यमसनला माघारी धाडत न्यूझीलंडची जोडी फोडली. विल्यमसनने 40 धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडच्या डावाला गळती लागली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. मिचेल स्टार्कने भेदक मारा करत न्यूझीलंडची अखेरची फळी कापून काढली. या पराभवामुळे न्यूझीलंडचं उपांत्य फेरीतलं स्थानही आता डळमळीत झालेलं आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध विजयाची गरज आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय पुरता फसला. लॉकी फर्ग्युसन, जिमी निशम आणि ट्रेंट बोल्ट यांनी भेदक मारा करत अवघ्या 92 धावांत कांगारुंचा निम्मा संघ माघारी धाडला. मात्र या परिस्थितीचा फायदा उठवणं न्यूझीलंडला जमलं नाही. उस्मान ख्वाजाने ऍलेक्‍स कॅरीच्या मदतीने भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत कांगारुंना 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. ख्वाजाने 88 तर कॅरीने 71 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 4 विकेट घेत चांगली कामगिरी केली. या संघांनी आतापर्यंत इतर संघांना धूळ चारत सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्न केला. या विजयासोबतच पॉईंटटेबलमध्ये ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान मिळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)