नॉटिंगहॅम – फलंदाजांनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा 48 धावांनी पराभव करत गुणतालिकेत पुन्हा पहिल्या स्थानी झेप घेतली.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 5 बाद 381 धावांची मजल मारत बांगलादेशसमोर विजयासाठी 382 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशला निर्धारित 50 षटकांत सर्वबाद 333 धावाच करता आला.
यावेळी प्रत्युत्तरात उतरलेल्या बांगलादेशच्या सलामीवीर तमिम इक्बालने 62 तर शाकिब अल हसनने 41 धावांची खेळी करत संघाला चांगली लय मिळवून दिली.
मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर लिटन दासही लवकर परतल्याने बांगलादेशचा संघ अडचणीत सापडला असताना मुश्फिकुर रहिम आणि महमदुल्लाहने 177 धावांची भागीदारी करत बांगलादेशला 300 धावांची मजल मारून दिली. यावेळी फटकेबाजीच्या नादात महमदुल्लाह 69 धावा करून बाद झाला. त्यामुळे बांगलादेशची धावगती थोडी खालावली.
मात्र, मुश्फिकुर रहिमने आपली फटकेबाजी सुरूच ठेवत आपले सातवे एकदिवसीय शतक झळकावले. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला साथ न मिळाल्याने त्यांना 333 धावांचीच मजल मारता आली. यावेळी मुश्फिकुरने नाबाद 102 धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि ऍरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला 9.3 षटकांत अर्धशतकी तर, 17 व्या षटकांत शतकी मजल मारून दिली. यावेळी वॉर्नरने 55 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर, दुसऱ्या बाजूने खेळणाऱ्या फिंचनेही 47 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
हे दोघे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारुन देणार असे वाटत असतानाच फिंच 53 धावांची खेळी करुन बाद झाला. यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजाला हाताशी धरत वॉर्नरने डावाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेत ऑस्ट्रेलियाला 27.2 षटकांत 150 धावांची मजल मारून तर, 34.3 षटकांत संघाला 200 धावा करून दिल्या.
दरम्यान वॉर्नरने 110 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपल्या कारकिर्दीतील 16वे शतक पूर्ण केले. शतकानंतर वॉर्नरने फटकेबाजी करत 40 षटकांत 250 तर 43.3 षटकांत 300 धावांची मजल ओलांडून दिल्यानंतर वॉर्नर 166 धावांची तडाखेबाज खेळी करुन बाद झाला. यानंतर आलेल्या मॅक्सवेलने फटकेबाजी 32 धावांची तडाखेबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाला 350 धावांची मजल ओलांडून दिली. मात्र, चोरटी धाव घेण्याच्या नादात तो बाद झाला. तर, त्याच षटकांत उस्मान ख्वाजा देखील 89 धावांची खेळी करून परतला. यानंतर ऍलेक्स केरी आणि मार्कस स्टोइनिसने ऑस्ट्रेलियाला 381 धावांची मजल मारून दिली.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 5 बाद 381 (डेव्हिड वॉर्नर 166, उस्मान ख्वाजा 89 सौम्या सरकार 3-58) बांगलादेश 50 षटकांत सर्वबाद 333 (मुश्फिकुर रहिम नाबाद 102).