ऑस्ट्रेलियाच विश्‍वविजेती; अंतिम सामन्यात इंग्लंडचा दारुण पराभव

नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) – ऍशली गार्डनरची अष्टपैलू कामगिरी आणि अन्य गोलंदाजांनी तिला दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने इंग्लडच्या महिला संघाचा सहज पराभव करत महिला टी – 20 विश्‍वचषकावर आपले नाव कोरले आहे. त्यांनी हा चषक चौथ्या वेळेस जिंकण्याची किमया देखील साधली आहे. यावेळी इंग्लंडने विजयासाठी दिलेले 106 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने केवळ 2 गडी गमावत पार केले. या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही पातळ्यांवर कमाल करणाऱ्या गार्डनरला सामनावीराच्या किताबाने गौरवण्यात आले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 19.4 षटकांत सर्बाद 104 धावा करत ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी 106 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने हे आव्हान 15.1 षटकांत केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात 106 धावा करत पूर्ण करत विजेतेपद पटकावले.

-Ads-

यावेळी प्रत्युत्तरात खेळताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी सावध परंतू वेगवान सुरुवात केली. यावेळी 4.4 षटकांत 29 धावा झाल्या असताना ऍलिसा हेली 20 चेंडूत 22 धावा करुण धावबाद झाली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या गार्डनरने दुसरी सलामीवीर बेथ मुनीसह ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला . परंतु, बेथ मूनी 14 धावांवर असताना डॅनिएली हेझलने तिला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्‍का दिला. मूनी बाद झाली तेंव्हा ऑस्ट्रेलियाच्या 44 धावा झाल्या होत्या.

दोन्ही सलामीवीर परतल्यावर गार्डनर आणि कर्णधार मेग लॅनिंग यांची जोडी जमली. या दोन्ही खेळाडूंनी संघाची आणखी पडझड न होऊ देता 8 षटकांमध्ये नाबाद 62 धावांची भागीदारी करत संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवून दिला. या वेळी गार्डनरने 33 धावांची खेळी केली तर मेग लॅनिंगने 28 धावा करत तिला सुयोग्य साथ दिली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंड संघाच्या भलताच अंगलट आला. त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. एकवेळ त्यांची अवस्था 3 बाद 41 झाली होती. त्यात बाद झालेल्या तीन फलंदाजांची योगदान फक्त 9 धावांचे होते. उर्वरित धावा सलामीवीर डॅनिएला वॅटने केल्या होत्या. तीन फलंदाज बाद झाल्यावर कर्णधार हिथर नाईट फलंदाजीस आली.

नाईट आणि वॅट यांनी इंग्लंडचा डाव सावरला. परंतु, वॅट 43 धावांची खेळी करून बाद झाल्यावर इंग्लंड संघाची पुन्हा गळती लागली. हिथर नाईट (25) आणि डॅनिएली वॅट (43) वगळता इंग्लंडची अन्य कोणतीही महिला फलंदाज दोन अंकी धावसंख्या गाठू शकली नाही. त्यामुळे इंग्लंडला केवळ 105 धावांचीच मजल मारता आली. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गार्डनरने 22 धावा देत 3 बळी मिळवले तर मेगन शूट आणि जॉर्जिया वारेहॅमने प्रत्येकी दोन बळी मिळवत तिला उत्तम साथ दिली.

संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड महिला संघ 19.4 षटकांत सर्वबाद 105 (डॅनिएली वॅट 43, हिथर नाईट 25, ऍश्‍ले गार्डनर 22-3, जॉर्जिया वारेहॅम 11-2) पराभुत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ 15.1 षटकांत 2 बाद 106 (ऍश्‍ले गार्डनर नाबाद 33, मेग लॅनिंग नाबाद 28, सोफी एक्‍सेलस्टोन 12-1).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)