औरंगाबाद : शिवसेना-भाजप यांच्यातच कलगीतुरा?

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला तेथे आमदारांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सगळीकडे शिवसेनेचाच बोलबाला आहे. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे लोकसभेचे सध्याचे खासदार आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही आणि खैरे या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेना त्यांना येथून बदलून दुसऱ्या कुणाला उमेदवारी देईल, अशी शक्‍यता दिसत नाही.

औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकांत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी झाला. पण शिवसेनेने कॉंग्रेसबरोबर युती करून सत्ता मिळविली. त्यानंतर शिवसेना आणि भाजपात छत्तीसचा आकडा होता. शिवसेनेकडून भाजप सदस्यांना सापत्न वागणूक मिळते असा आरोप भाजप वारंवार करत होता. इतकेच नाही तर जनहिताच्या कामांसाठी वाटप होणाऱ्या निधीच्या यादीतही भाजप सदस्यांना डावलण्यात आले. आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनीही ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. उलट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपासाठीची जी यादी खैरे यांनी दिली ती कॉंग्रेस आणि शिवसेना सदस्यांची नावे होती. त्यातून भाजपच्या सदस्यांना डावलण्यात आल्याचा आरोप भाजपच्या एल. जी. गायकवाड यांनी केला. त्यासाठी न्यायालयात जाण्याचाही विचार त्यांनी बोलून दाखवला.

आता जिल्हा परिषदेत शिवसेना कॉंग्रेसबरोबर असल्याने लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणे अडचणीचे ठरणार आहे, असे आता भाजपने म्हणायला सुरुवात केली आहे. अर्थात हे करण्यामागे भाजपचे दबाव तंत्र आहे. शिवसेना कॉंग्रेसबरोबरच्या युतीतून बाहेर पडली तर औरंगाबाद जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांपैकी 5 भाजप-शिवसेनेच्या ताब्यात येतील, असे भाजपला वाटते. आता युती झालीच आहे तर वरिष्ठांचा आदेश म्हणून खैरेंचा प्रचार करू पण त्यात आमचे मन असणार नाही, असे भाजपचे कार्यकर्ते म्हणत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे आव्हान भाजपच्या सगळ्या वरीष्ठ नेत्यांपुढे आहे.

खासदार चंद्रकांत खैरे अतिशय धार्मिक आहेत. धार्मिक भावनांना हात घालूनच ते निवडणूक जिंकतात असा आरोप त्यांच्यावर होतो. औरंगाबादमध्ये निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदू-मुस्लीम वाद उफाळून येणे हे नित्याचे झाले आहे. असा वाद निर्माण झाला की स्वाभाविकच हिंदू शिवसेनेकडे वळतात, असा आरोप होतो. आताही खैरे यांचे धार्मिक कार्यक्रम वाढले आहेत. मुळातच चंद्रकांत खैरे यांना विकासाची कामे करण्यापेक्षा मंदिरांत पूजा करणे, हरिनाम सप्ताह करणे अशा कामांतच जास्त रस आहे. पण त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी त्यांनी पीएंची एक फौजच नेमली आहे. खैरे यांना फक्त भाजपच्याच नाराजीचा नाही तर पक्षातील नाराजीचाही सामना करावा लागतो आहे. क़न्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव हे खैरे यांचे पक्षातले मोठे टीकाकार आहेत. त्यांनी तर खासदार निधीतील घोटाळाही समोर आणला होता. खैरे यांच्याविरोधात खूप लोक असले तरी त्यांच्याशिवाय पर्याय नाही हे त्यांचे विरोधकही कबूल करतात.

या मतदारसंघात कॉंग्रेस- राष्ट्रवादीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. मुळात या मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार लढणार की राष्ट्रवादीचा हेच अजून ठरलेले नाही. राष्ट्रवादीने या मतदारसंघाची मागणी केली आहे. कॉंग्रेसने ही मागणी धुडकावून लावलेली नाही, पण होकारही दिलेला नाही. गेल्या चार निवडणुका खैरे यांनी जिंकल्या. त्यांना रोखू शकेल असा उमेदवार विरोधी पक्षांकडे नाही. कॉंग्रेस तर अंतर्गत लाथाळ्यांनी ग्रासलेला आहे. जे लोक कॉंग्रेसकडे उमेदवारीचा मागणी करत आहेत, त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पक्षातूनच होत आहेत. पक्षातील वाद इतके विकोपाला गेले आहेत की ही जागा कॉंग्रेसने राष्ट्रवादीला सोडावी असे जाहीरपणे कॉंग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी मागणी केली आहे. यावेळी औरंगाबादमध्ये प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन पक्ष आणि असिदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमची आघाडीही निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांचे आव्हान नेमके कुणाला भारी पडते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. प्रकाश आंबेडकरांना आघाडीत येण्याचे आमंत्रण देऊन कॉंग्रेस थकला, पण आंबेडकर ऐकायला तयार नाहीत. त्यांना आपली ताकद आजमवण्याची घाई झाली आहे. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसने दिलेल्या 22 जागाही स्वीकारल्या नाहीत. आपण 48 जागांवर निवडणूक लढवत आहोत, 22 जागांनी कसे भागणार असा प्रश्‍नच त्यांनी विचारला आहे. पण यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परंपरागत मतदारांत फूट पडेल अशी चिन्हे आहेत.

मतदारसंघाची रचना
औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील 105-कन्नड, 107-औरंगाबाद मध्य, 108-औरंगाबाद पश्‍चिम (अ.जा.), 109-औरंगाबाद पूर्व, 111-गंगापूर आणि 112-वैजापूर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून सहा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र मिळून या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आहे. कन्नड, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद या तालुक्‍यांचा या मतदारसंघात समावेश होतो. गंगापूर तालुक्‍यातील, शेंदुरवाडा, वाळूज, हरसूल, तर्काबाद, गंगापूर महसूल मंडल, गंगापूर नगरपालिका तसेच मांजरी सिद्धनाथ वडगाव या महसूल मंडलांचा समावेश या मतदारसंघात होतो. याशिवाय औरंगाबाद महापालिका कार्यक्षेत्राचा यामध्ये समावेश आहे.

जातीय प्रभाव…
या लोकसभा मतदार संघात लेवा पाटील, मराठा, ब्राह्मण, वाणी या समाजानी सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळविले असून तुलनेने अनुसूचित जाती जमाती शिवाय ओबीसीमधील घटक जातींचा तसेच मुस्लीम समाजाची लोकसंख्या देखील प्रभावशील असून या समाजाच्या सहभागावर येथील राजकारणातील यश-अपयश अवलंबून आहे. या मतदारसंघात खुला प्रवर्ग 31.83 टक्‍के, इतर मागास वर्ग 29.15 टक्‍के, अनुसूचित जाती 13.51 टक्‍के, अनुसूचित जमाती3.08 टक्‍के आणि इतर 22.43 टक्‍के आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)