मायक्रो स्क्रीन्स: आंटीजी

प्राजक्‍ता कुंभार

आजची गोष्ट जरा वेगळी आहे… मी नेहमी लिहिते, त्यापेक्षा जरा वेगळी. शॉर्ट फिल्मबद्दल बोलूयातच, पण त्याआधी या शॉर्टफिल्ममध्ये काम करणाऱ्या आणि सर्वार्थानं नायिका असणाऱ्या अनमोल रॉड्रिग्जबद्दल जाणून घेऊयात. ही अनमोल ऍसिड अटॅक सर्व्हायवर आहे. अनेकदा एकतर्फी प्रेमाला मिळणारे नकार स्वीकारता आले नाहीत, की भेकडपणे ऍसिड अटॅक या विकृतीचा वापर केला जातो. पण अनमोलची गोष्ट वेगळीच आहे. ती फक्‍त दोन महिन्यांची होती, जेव्हा तिच्या बापाने (?) तिच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकलं. कारण काय, तर त्याला मुलगी नको होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आईच्या कुशीत गुरफटून दूध पिणाऱ्या अनमोलला त्यावेळी काय कळलं; काय नाही, माहीत नाही, पण वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत आपण इतरांपेक्षा वेगळे का दिसतोय या प्रश्नाने नक्कीच छळलं. पुढे तिचा चेहरा पाहून घाबरून जाणाऱ्या तिच्या वयाच्या कोणीच तिच्याशी मैत्री केली नाही. ती एकटी राहिली खरी,पण तिने “गिव्ह अप’ नाही केलं. तिने सुरू केलेलं “साहस फाऊंडेशन’ चर्चेत आलं आणि तिची गोष्ट जगाला कळाली.

तर आंटीजी. ही गोष्ट आहे स्वप्नांच्या पाठलागाची. लोकांना काय वाटेल, ते आपल्याबद्दल, आपल्या एखाद्या कृतीबद्दल काय विचार करतील या सगळ्याच्या पल्याड जाऊन स्वतःसाठी जगण्याची! अदीब रईस या दिग्दर्शकाची ही 20 मिनिटांची गोष्ट, इतरांकडे ठराविक स्टिरीओटाइप चष्म्यातून बघण्याला आपल्या समोर मांडते. बरं, ही गोष्ट ज्या दोन नायिकांभोवती फिरते, शबाना आझमी आणि अनमोल, त्यांची स्वप्नंही फार काही भव्यदिव्य नाहीयेत. खूप सहज आणि सोप्या अपेक्षा आहेत त्यांना आयुष्याकडून. पण तरीही ही छोटीछोटी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांना आजूबाजूच्या किती प्रश्नार्थक नजरांचा सामना करावा लागतो, याचा प्रवास उलगडते ही गोष्ट.

या दोघींच्या गोष्टी अगदी वेगवेगळ्या आहेत. एक नामवंत ऍडव्हर्टीझमेंट कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळालेली गीतिका (अनमोल) आणि नवरा गेल्यानंतर एकटीच राहणारी, पण स्वतःपुरतं आनंदाने जगू पाहणारी पारसी आंटी (शबाना आझमी) यांची ही गोष्ट. टॅक्‍सी ड्रायव्हरला द्यायला पैसे हवे, म्हणून “सुट्टे पैसे आहेत का, असं गीतिका विचारत असताना या दोघींची ओळख होते. गीतिकाला सुट्टे पैसे देताना, या दोघींची थोडक्‍यात मैत्री होते. बास, एवढीच काय ती या दोघींची ओळख. पुढे या दोघींची वेगवेगळी गोष्ट सुरू होते.

नव्या ऑफिसमध्ये खूप अपेक्षा घेऊन प्रवेश केलेल्या गीतिकाला तिथल्या सुशिक्षित वातावरणातही, फक्त तिच्या चेहऱ्यामुळे दुर्लक्षित केलं जातं, तिची खिल्ली उडवली जाते, तिच्या टॅलेंटला उगाचच सहानुभूतीची किनार लावून बघितलं जातं. अगदी तिच्या चेहऱ्याच्या कंपनीच्या पीआरसाठी वापर करून घ्यायचाही विचार होतो.

गोष्टीच्या दुसऱ्या बाजूला असते ती टॅटू करायच्या हौसेला आणि इच्छेला मुलाने नाकारलेली, ‘आता या वयात तू टॅटू केला, तर लोक काय म्हणतील, मी तुझ्या नातवाला काय सांगू?’ या प्रश्नानं निराश झालेली आंटीजी. या दोघी पुन्हा भेटतात ते त्याच दिवशी संध्याकाळी आणि त्यांच्या चर्चेतून निराश झालेल्या गीतिकाला गवसतो सकारात्मकतेचा सूर. एक अपेक्षित सुखद शेवट.

ही गोष्ट म्हणजे आरसा आहे, आपणच आपल्याला दाखवलेला. ठराविक साचेबद्ध नजरेतून जगाकडे बघणारी आपली नजर बदलण्याचा प्रयत्न करते ही शॉर्टफिल्म. उत्तम कथानक, साजेसा अभिनय अशी सर्वच पातळ्यांवर उत्तम जुळून आलेली आणि ‘बिनधास्त करा आपल्या स्वप्नांचा स्वीकार’ हे सुचवणारी ही गोष्ट जरूर एकदा अनुभवावी अशीच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)