ऍटर्नी जनरल आणि कॅगला लोकलेखा समितीपुढे बोलावणार : खर्गे

राफेल अहवालाविषयी विचारणा करणार 

सरकारने सर्वोच्च न्यायालयाला खोटी माहिती दिल्याचा दावा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली: राफेल प्रकरणात कॅगचा अहवाल आला आहे व तो संसदेच्या लोकलेखा समितीने तपासला आहे अशी खोटी माहिती सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयाला देऊन न्यायालयाची दिशाभुल करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी ऍटर्नी जनरल आणि कॅगला लोकलेखा समितीपुढे हजर राहण्यास आम्ही सांगणार आहोत असे या समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले आहे.

राफेल प्रकरणात सरकारने न्यायालयापुढे जी अर्धवट व असत्य माहिती ठेवली आहे त्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने काल आपला निकाल दिला आहे. न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो परंतु त्यामुळे राफेलचे सत्य झाकले जाणार नाही. केवळ संयुक्त संसदीय समितीपुढे होणाऱ्या चौकशीतूनच राफेलचे सत्य बाहेर येईल असे खर्गे यांनी सांगितले.राफेल प्रकरणी कॅगचा अहवाल अजून खुद्द कॅग कडेच उपलब्ध नाही कारण अजून तो अहवालच तयार व्हायचा आहे असे असताना सरकारने कोटापुढे खोटी माहिती दिली आहे असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही कॅगच्या प्रमुखांना लोकलेखा समिती पुढे बोलावून हा अहवाल त्यांनी संसदेपुढे कधी ठेवला किंवा लोकलेखा समितीपुढे तो कधी सादर करण्यात आला याची शहानिशा करून घेणार आहोत.

सरकारने ऍटर्नी जनरल मार्फत ही माहिती न्यायालयाला दिली असल्याने या प्रकरणी ऍटर्नी जनरलकडेही आम्ही या विषयी विचारणार करणार आहोत असे खर्गे यांनी सांगितले. कॅगचा अहवाल संसदेत सादर करण्यात आला आहे आणि लोकलेखा समितीने तो तपासला आहे असे विधान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात करण्यात आले आहे. ज्या अर्थी न्यायालयाने हे मत दिले आहे त्या अर्थी सरकारकडूनच त्यांना अशी माहिती देण्यात आली आहे त्यामुळे आम्हाला कॅग आणि ऍटर्नी जनरलकडूनच हे सत्य जाणून घेणे महत्वाचे वाटते असे ते म्हणाले. हा साराच मामला धक्‍कादायक असून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभुल केल्या प्रकरणी सरकारनेच माफी मागीतली पाहिजे अशी मागणीही खर्गे यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)