रॉजर फेडरर पहिल्याच फेरीत गारद; जोकोव्हिचची विजयी सलामी

एटीपी फायनसलाच्या पहिल्याच सामन्यात निशिकोरीने केले पराभूत

लंडन – सर्वकालीन महान टेनिसपटू रॉजर फेडरर याला एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सच्या पहिल्याच सामन्यात धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केई निशिकोरीने फेडररचा 7-6(7-4), 6-3 असा पराभव केला. तर, दुसरीकडे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नोवाक जोकोव्हिचने अमेरिकेच्या जॉन इस्नरला 6-4, 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत करून स्पर्धेत विजयी आगेकूच केली आहे.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या स्वित्झरलॅंडच्या रॉजर फेडरर पहिल्या सामन्यात लईत नव्हता. या सामन्यात त्याने अनेक चुका केल्या. पहिल्या सत्रात त्याने 20 अनफोर्स्ड चुका केल्या. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱ्या निशिकोरीने त्याच्या चुकांचा फायदा उचलत पहिला सेट टायब्रेकरमध्ये 7-6 (7-4) असा जिंकला.

तर, दुसऱ्या सत्रात फेडररचा खेळ आणखीनच खालावला. दुसऱ्या सत्रात निशिकोरीने आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडवत हा सेट 6-3 असा आपल्या नावे करत सामनाही जिंकला. एटीपी फायनल्स ही स्पर्धा विक्रमी 6 वेळा जिंकणाऱ्या फेडररलाया पराभवामुळे पुढील फेरीत प्रवेश करणे थोडे अवघड झाले आहे.

त्याला त्याच्या ग्रुप मधील अन्य सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे. मागील काही आठवड्यांपूर्वीचे पॅरिस ओपनमध्ये फेडररने निशिकोरीला हरवले होते. परंतु या सामन्यात फेडररला हरवून निशिकोरीने त्या पराभवाची परतफेड केली. फेडररचा पुढील सामना डॉमनिक थिएम विरुद्ध होणार आहे.

सामन्यानंतर फेडरर म्हणाला, पहिल्या सेटमध्ये आम्हा दोघांनाही स्थिरावण्यासाठी थोडा वेळ लागला. माझ्याकडून खूप चुका झाल्या. त्यामुळे मी हा सामना गमावला आहे. विजयानंतर निशिकोरी म्हणाला, मी मागील काही सामन्यात फेडरर विरुद्ध हरलो होतो. या सामन्यात मी आक्रमक खेळ करण्याची रणनीती आखली होती. त्याचा मला फायदा झाला आणि हा विजय मिळाला. मला नशिबाची देखील साथ मिळाली पण आज मी चांगला खेळ केला.

दुसरीकडे , जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या नोवाक जोकोव्हिचने वेगवान सर्व्हिससाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमेरिकेच्या जॉन इस्नरला सरळ सेटमध्ये 6-4, 6-3 अश्‍या फरकाने पराभूत करून प्रतिस्पर्धांसाठी धोक्‍याची घंटा वाजवली आहे. त्याने दोन्ही सेटमध्ये चांगला खेळ केला. या सामन्यात त्याने आपली सर्व्हिस राखण्यावर भर दिला आणि बेस लाईनवर उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.

या सामन्यानंतर जोकोव्हिच म्हणाला, मी इस्नरच्या तीन सर्वीस भेदल्या. जे जवळजवळ अशक्‍य होते. मी माझ्या बलस्थानांवर गुण घेतले. मी उत्तम सर्वीस केल्या, सामन्यात चुकांवर नियंत्रण ठेवले आणि सामना जिंकला, असेही त्याने यावेळी नमूद केले. जोकोव्हिचचा पुढील सामना जर्मनीच्या ऍलेक्‍झांडर झ्वेरेव्ह विरुद्ध होणार आहे.

तर, स्पर्धेतील अन्य एका सामन्यात सहाव्या मानांकीत केविन अँडरसनने डॉमनिक थिएमचा 6-3, 7-6 (12-10) असा टायब्रेकरमध्ये पराभव करत एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये विजयी पदार्पण केले. तर दुसऱ्या सामन्यात जर्मनीच्या ऍलेक्‍झांडर झ्वेरेव्हने मारिन चिलीचचा 7-6 (7-5), 7-6 (7-1) असा पराभव केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)