एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा अभाव ः एटीएम फोडल्याचे प्रकार होऊनही निष्काळजीपणा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध बॅंकांच्या एटीएम सेंटरची सुरक्षा वाऱ्यावर आहे. शहरात एटीएम फोडल्याच्या, एटीएमजवळ नागरिकांना लुटल्याच्या घटना घडूनही अद्याप बॅंकांना शहाणपण आलेले नाही. एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याने व सुरक्षेविषयी आवश्‍यक सुविधा नसल्याने पैसे काढायला जाणाऱ्या नागरिकांना भिती वाटत आहे.

एटीएमजवळ टवाळखोरांचे प्रमाण वाढत असून प्रत्येक एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक नेमावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही एटीएम सेंटर तर श्‍वानांचे विश्रामगृह झाले आहे. एटीएममध्ये एसी असल्यामुळे व सुरक्षा रक्षक नसल्यामुळे श्‍वान एटीएममध्ये दीर्घ वामकुक्षी करताना आढळून येत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर व उपनगर भागात प्रत्येक चौकात व महत्वाच्या वर्दळीच्या भागात विविध बॅंकचे एटीएम सेंटर बसवण्यात आले आहे. मात्र, बहुतांश सेंटरवर सुरक्षा-रक्षक नसल्याने नागरिकांना असुरक्षितता वाटत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अनेक एटीएम आहेत. पिंपरीतील खराळवाडी येथील महामार्गालगत असलेले एटीएम सुरक्षा रक्षक नसल्याने बेवारस स्थितीत आहेत. येथे पैसे काढायला येणारांची मोठी संख्या आहे. परंतु येथे सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिक पैसे कढण्यासाठी घाबरत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

याआधी एटीएम सेंटरवर पैसे लुटण्याचे प्रकार घडले आहेत. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे नागरिक पैसे काढत असतानाही इतरजण आत येऊन उभारतात. विशेषतः महिलांना ही समस्या अधिक जाणवत आहे. खराळवाडी परिसरातील एटीएमवर सेंटरमध्ये कुत्र्यांचा वावर सुद्धा वाढला आहे. याकडे संबधित बॅंकांनी लक्ष देण्याची आवश्‍यकता असून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करुन प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)