ग्राहकांची फसवणूक करून एटीएम चोरणारे दोघे गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : उल्हासनगरच्या चौघांची टोळी

चोरांकडून महामार्गालगतची बॅंक टार्गेट!

स्टेट बॅंक ऑफ इंडियाची मुख्य शाखा ही महामार्गालगत आहे. त्यामुळे येथे मोठी गर्दी असते. महिन्या पाच तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत गर्दी असते. या काळात येथे चोरीच्या घटना अधिक घडतात. चोरांना महामार्गालगत असलेल्या बॅंकाना व त्यांच्या ग्राहकांना टार्गेट करणे सोपे जाते. त्यामुळे पोलिसांनी येथे कायमस्वरूपी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी बॅंक प्रशासन आणि ग्राहकांकडून होत आहे.

नगर – हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करून ग्राहकांच्या बॅंक खात्यातून पैसे काढणारी टोळी उघडकीस आली आहे. उल्हासनगरची ही टोळी असून, स्थानिक गुन्हे शाखेने त्यातील दोघांना अटक केली आहे. दीपक बिपीन झा (वय 23) व राजू नानक खेरलीया (वय 30, दोघे रा. भैय्यासाहेब आंबेडकरनगर, ओटी सेक्‍शन, उल्हासनगर) असे त्यांची नावे आहेत. या दोघांकडून वेगवेगळ्या बॅंकांकडील 29 एटीएम कार्ड आणि 48 हजारांची रक्कम जप्त केली आहे.

-Ads-

ऋषीकेश नीलेश फुलसौंदर (वय 18, रा. सारोळाबद्धी) याची स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतून 20 हजार, तर मंजू कुसवाह (रा. दरेवाडी) यांची 54 हजार रुपयांची रक्कम या चोरांनी परस्पर काढून घेतली. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अशा पाच गुन्ह्यांची नोंद असून, या दोघांना त्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेजवळ पोलिसांनी सापळा लावला होता. दीपक व राजू हे दोघे जण एटीएमजवळ घुटमळत होते. पोलिसांनी त्यांना तत्काळ बाजूला घेत ताब्यात घेतले. या दोघांना घेऊन जात असताना पोलिसांच्या समोर उभी असलेली काळ्या रंगाची मोटारगाडी वेगाने तेथून निघून गेली. पोलिसांनी याबाबत या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्यांची माहिती देत आणखी दोघांची नावे सांगितले. संदीप साळवे व सुमित सिंग (दोघे. रमाबाई टेकडी, उल्हासनगर) अशी आणखी दोघांची त्यांनी नावे सांगितली.

दीपक व राजू या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांच्याकडून वेगवेगळ्या बॅंकांची 29 एटीएम कार्ड आणि रोख रक्कम 48 हजार रुपये सापडले. या दोघांनी चोरी करण्याची पद्धतही सांगितली. एटीएम केंद्राजवळ थांबून तिथे येणाऱ्यांवर लक्ष ठेवायचे. पैसे निघत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांना मदतीसाठी पुढे व्हायचे. तिथे हातचलाखी करून त्यांचे एटीएम काढून घ्यायचे आणि पीन कोड काढून त्या खात्यातून पैसे काढून घ्यायचे. अशा पाच गुन्ह्यांची त्यांच्याकडून माहिती या दोघांकडून मिळाली आहे. भिंगार कॅम्प पोलिसांकडे अशा गुन्ह्याची नोंद आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)