प्रभाग कार्यालय बैठकीतही “कचराकोंडी’ हिटलिस्टवर

ठेकेदाराच्या बिलातून रक्‍कम वसूल करणार
नगरसेवकही वैतागले : सर्वाधिक चर्चा होऊनही तोडगा नाहीच

पिंपरी – सध्या शहरातील कचरा प्रश्‍न गाजत असून, या कचरा कोंडीचीच चर्चा प्रभाग कार्यालयाच्या बैठकीत होऊ लागली आहे. त्याचबरोबरच पाणी कपातीबद्दलदेखील चर्चा होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कचरा समस्या दूर करण्याला प्राधान्य देण्याची सूचना महापौर राहुल जाधव यांनी केली आहे. एक जुलैपासून सुरू झालेली कचराकोंडी प्रत्येक बैठकीत सर्वाधिक चर्चेत आहे. चर्चा, आरोप-प्रत्योराप होऊन देखील या समस्येवर मात्र अद्याप तोडगा मिळाला नाही.
प्रभागस्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये त्यांनी केले आहे. सोमवारी (दि.15) ब प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत कचरा आणि पाणी या दोन्ही नागरी समस्यांवरच अधिक वेळ चर्चा करण्यात आली. त्यामध्ये ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे प्रभागातील नागरिकांच्या प्रश्‍नांचा भडीमार सहन करावा लागत असल्याची कैफियत नगरसेवकांनी मांडली. ही समस्या सोडविण्यासाठी सर्व आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय इतरही कामांबाबत सूचना करण्यात आल्या. शहर विकासासाठी पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविकांच्या येणाऱ्या सूचना विचारात घेऊन विकास कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी दिल्या. या बैठकीला उपमहापौर सचिन चिंचवडे, “ब’ प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, नामदेव ढाके, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, संगीता भोंडवे, मोना कुलकर्णी, अश्‍विनी चिंचवडे, निता पाडाळे, उषा काळे, स्वीकृत सदस्य ऍड. मोरेश्‍वर शेडगे, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्‍त संदीप खोत, कार्यकारी अभियंता एकनाथ पाटील, चंद्रशेखर धानोरकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे उपस्थित होते.

ए.जी. एनव्हायरो या ठेकेदाराकडून कचरा संकलनाचे काम अधिक वेगाने व्हावे, याकरिता महापालिकेच्या वतीने 50 वाहने चालकांसह पुरविण्यात आली आहेत. त्यामुळे ठेक्‍यासाठी न्यायालयात गेलेल्या ठेकेदारावर महापालिका एवढी मेहेरबान का? असा सवाल केला जात आहे. त्यावर या ठेकेदाराला पुरविल्या जाणारी वाहनांची रक्कम ठेकेदाराच्या बिलातून वसूल केली जाईल, अशी माहिती पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)