पुणे – रजत कदम व ईशा जोशी यांनी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे पुरूष व महिला गटात विजेतेपद पटकाविले. शारदा सेंटरतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
शारदा सेंटर येथे झालेल्या स्पर्धेतील पुरूषांच्या अंतिम सामन्यात तृतीय मानांकित कदम याने आर्यन पानसे याच्यावर मात केली. रंगतदार लढतीत कदम याने 7-11, 11-8, 9-11, 11-3, 11-8, 5-11, 14-12 असा विजय मिळविला. त्याने टॉपस्पीन फटक्यांचा सुरेख खेळ केला. उपांत्य फेरीत त्याने धनंजय बर्वे याला हरविले होते. आर्यन याने श्रियश भोसले याचे आव्हान संपुष्टात आणले होते. महिलांच्या गटात ईशा हिने पृथिका सेनगुप्ता हिला हरविले. अग्रमानांकनास साजेसा खेळ करीत तिने ही लढत 11-4, 11-7, 11-7, 11-5 अशी जिंकली.
युवा मुलांच्या विभागात आर्यन पानसे याने अजिंक्यपद घेत पुरूषांच्या गटातील पराभवाची कसर भरून काढली. त्याने अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित आरूष गलपल्ली याचा पराभव केला. चुरशीने झालेला अंतिम सामना त्याने 11-7, 11-4, 7-11, 11-3, 2-11, 11-9 असा जिंकला. मुलींच्या विभागात पृथा वर्टीकर विजेती ठरली. तिने रोमहर्षक सामन्यात ईशा जोशी हिला 13-11, 6-11,1 11-3, 11-8, 9-11, 12-14, 11-8 असे पराभूत केले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ टेबल टेनिस संघटक स्मिता बोडस, श्रीराम कोनकर, श्रीकांत अंतुरकर, डॉ. मोहन उचगावकर, अरविंद नातू, सतीश ठिगळे, माजी राष्ट्रीय खेळाडू राजेश शेलार यांच्या हस्ते झाला.