“झेडपी’च्या स्मार्ट ग्राम योजनेत टाकवे बुद्रुक तळाशी

जिल्हा परिषदेने घेतलेल्या स्मार्ट ग्रामपंचायत उपक्रमात कान्हेवाडीतर्फे चाकण गाव प्रथम

…अशी आहे स्मार्ट ग्राम योजना

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात “इको व्हिलेज’ ही योजना शासनाने बंद करीत नव्या स्वरूपात “स्मार्ट ग्राम’ही योजना साकारली आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षात निकषपात्र गावांना निधी स्वरूपात रक्‍कम मिळत होती; मात्र आता 21 नोव्हेंबर 16च्या शासन निर्णयान्वये “स्मार्ट ग्राम’मध्ये तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या गावांनाच भरीव बक्षीस दिले जाते.  

इंदोरी  – पुणे जिल्हा परिषदेने घेतलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत खेड तालुक्‍यातील कान्हेवाडी तर्फे चाकण या ग्रामपंचायतीने 93 टक्‍के गुण पटकावून प्रथम क्रमांक पटकावला, अशी माहिती सरपंच शांता येवले यांनी दिली. या योजनेत मावळ तालुक्‍यातील टाकवे बुद्रुक गाव तळातील क्रमांकावर समाधान मानावे लागले.

कान्हेवाडी गाव प्रत्येक सरकारी योजना व उपक्रमांत सहभागी असते. गावाने तालुका, जिल्हा, राज्य व देशपातळीवरील अनेक पुरस्कार मिळवून एक मॉडल गाव म्हणून नावारुपास आले आहे.
राज्यातील सर्व भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या निकषांत व स्वरुपात बदल करून प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यात सर्वाधिक गुणप्राप्त ग्रामपंचायतीची तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवड झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुका स्मार्ट ग्राम गुणांसह : तालुका खेड : कान्हेवाडी तर्फे चाकण (गुण 93), जुत्रर : काळवाडी (गुण 89.5), शिरूर : करडे (गुण 89), आंबेगाव : राजेवाडी (गुण 87) मुळशी : भूगाव (गुण 86), हवेली : खामगाव टेक (गुण 82), भोर : नसरापूर (गुण 81), बारामती : सांगवी (गुण 78), इंदापूर : डिकसळ (गुण 77), दौंड : पडवी (गुण 72), वेल्हा : लव्ही बुद्रुक (गुण 71) मावळ : टाकवे बुद्रुक (गुण 63).

ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच कान्हेवाडी तर्फे चाकण आदर्श गाव आहे. गावच्या विकासकामांसाठी गावाची एकी तसेच ग्रामस्थ, युवक व महिलांचे मोलाचे सहकार्य यामुळे कान्हेवाडी गाव आदर्श ठरल्याचे उपसरपंच विनोद येवले व ग्रामसेवक अरुण हुलगे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)