बोगस मतदानाच्या वादातून आठ जणांविरुद्ध ऍट्रॉसिटी दाखल

जामखेड येथील घटना ः सरपंचाच्या मुलासह चार जण जखमी

जामखेड – मतदानावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने नेमलेल्या मतदान प्रतिनिधीने तुम्ही दुसऱ्याचे मतदान का करता असे विरोधकांना विचारल्याचा राग आल्याने झालेल्या मारहाणीत पिंपळगाव उंडा येथील सरपंचांच्या मुलासह चार जण जखमी झाले. या मारहाण प्रकरणी एकूण आठ जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला मारहाण व ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि 23 रोजी तालुक्‍यातील पिंपळगाव उंडा येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना फिर्यादी सरपंचाचा मुलगा विश्‍वजीत मित्रजीत भालेराव वय 23 रा. पिंपळगाव उंडा हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मतदान प्रतिनिधी म्हणून काम पाहत होता. यावेळी त्याने आरोपींना तुम्ही दुसऱ्या मतदारांचे मतदान करण्याचा प्रयत्न का करता असे म्हणून दुसऱ्याचे मतदान करण्यास विरोध केला. याचा राग आरोपींना आल्याने त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व जखमींना लाथाबुक्क्‌यांनी मारहाण करून फिर्यादीच्या वडिलांना उचलून खाली आपटले व फिर्यादी विश्‍वजीत भालेराव यास जातीवाचक शिवीगाळ केली. यानंतर रावसाहेब गव्हाणे यांना डोक्‍यात दगड व वीटा मारून दुखापत केली.

या मारहाणीत फिर्यादी विश्‍वजीत मित्रजीत भालेराव, मित्रजीत दगडू भालेराव, गणेश हरीदास जगताप व रावसाहेब ज्ञानदेव गव्हाणे सर्व रा. पिंपळगाव उंडा हे चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी आरोपी सतिश विक्रम ढगे, उमेश श्रीधर ढगे, गणेश मधुकर ढगे, स्वप्नील बबन मोरे, रंजीत बबन ढगे, विलास घनश्‍याम मोरे, चत्रभुज घनश्‍याम मोरे, रमेश बबन ढगे अशा आठ जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला मारहाण व ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)