विज्ञानविश्‍व: ऍस्ट्रोबायोलॉजी

डॉ. मेघश्री दळवी

गेल्या आठ-दहा वर्षांत अनेक बाह्य ग्रहांचा, म्हणजे सूर्यमालेच्या पलीकडच्या एक्‍झोप्लॅनेट्‌सचा शोध लागलेला आहे. यातले काही ग्रह त्यांच्या ताऱ्यांपासून अगदी योग्य अंतर राखून आहेत. तिथे तापमान पराकोटीचे उष्ण नाही, की अतिथंड देखील नाही, त्यामुळे तिथे पाणी असू शकते आणि सजीव जगू शकतात. राहण्यायोग्य अशा या पट्ट्याला गोल्डीलॉक्‍स झोन या नावाने ओळखले जाते. गोल्डीलॉक्‍सच्या परिकथेत जास्त गरम नाही, जास्त थंड नाही अशा मध्यम लापशीचा उल्लेख आहे, म्हणून हे गमतीचे नाव.

गोल्डीलॉक्‍स झोनमध्ये असणारे नवे बाह्य ग्रह सापडले की साहजिकच मनात प्रश्‍न उभा राहतो की, तिथे कुणी सजीव असतील का, लहानमोठे प्राणी, किंवा निदान जीवाणू-विषाणू तरी सापडतील का? अशी उत्सुकता असणे स्वाभाविक आहे, कारण या अफाट अंतराळात फक्‍त पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती झाली हे पटणे कठीणच. म्हणूनच आणखी कुठेतरी जीवसृष्टी असेल का? हा शोध सतत सुरू असतो. सजीवांसाठी कोणते ग्रह योग्य ठरतील, तिथे वातावरण कसे असावे, अशा प्रश्‍नांचा अभ्यास करणारी खास शास्त्रशाखा आहे ऍस्ट्रोबायोलॉजी.

सुमारे 50 वर्षांपूर्वी ऍस्ट्रोबायोलॉजीची वाटचाल सुरू झाली. तिचा एकंदरीत रोख होता तो सजीवांचा उगम कुठे, का, कसा आणि ते कसे उत्क्रांत होत जातात याच्याकडे. यावर संशोधन करायला अनेक शास्त्रशाखांची मदत लागते. जीव, रसायन, खगोल, भौतिक, भूगोल, पर्यावरण अशा बऱ्याच शास्त्रांसोबत तिथे गणिताचा, विशेषत: सांख्यिकीचा आधारही घेतला जातो.

24 वर्षांपूर्वी बाह्य ग्रहांचा शोध लागायला सुरुवात झाली तसे ऍस्ट्रोबायोलॉजीतले संशोधन वाढायला लागले. सजीवांच्या उत्पत्तीची नवनवी मॉडेल्स बनायला लागली. केवळ पाणी किंवा मध्यम तापमान पुरेसे नसून इतर अनेक गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात याकडे लक्ष जायला लागले.

पृथ्वीवर आर्क्‍टिक प्रदेशात बर्फाखाली, कोरड्या वाळवंटात किंवा अतिशय खोल समुद्रात ज्वालामुखीच्या उष्ण झोतांमध्ये काही सजीव आढळतात. अतिशय टोकाची परिस्थिती असतानाही ते तिच्याशी जुळवून घेत राहात असतात. त्यांचा अभ्यास करून त्यावरून अंतराळात सजीव असण्याची शक्‍यता कुठेकुठे असेल, ती कशी निश्‍चित करायची याचा विचार करणे खरोखरच थरारक आहे. समजा, असे सजीव कुठे अस्तित्वात असतील, तर ते आपण शोधून कसे काढायचे, त्यांच्या अस्तित्व खुणा (बायोसिग्नेचर) कशा असतील हे सगळे तपशील केवळ पृथ्वीवरच्या निरीक्षणामधून मांडायचे हे कौशल्याचे काम आहे. उद्या असे सजीव एखाद्या ग्रहावर मिळतील तेव्हा या संशोधनाचा खरा अर्थ लक्षात येईल.
त्याच वेळी पृथ्वीवर कार्बन-आधारित जीवन आहे, म्हणजे अंतराळातही तसेच असेल असे नव्हे. तर सिलिकॉन, सल्फर-आधारित जीवनही उभे राहू शकते, ते आपल्यापेक्षा पूर्णपणे भिन्न प्रकारे उत्क्रांत होऊ शकते, असे नवनवे शास्त्रीय तर्क या शाखेच्या अभ्यासातून पुढे येत असतात.

अलीकडे ऍस्ट्रोबायोलॉजीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा) वापर होतो आहे. ग्रहांवरची वेगवेगळी परिस्थिती आणि सजीवांची वेगवेगळी मॉडेल्स यांचा ताळमेळ घालताना खूप गुंतागुंतीचे विश्‍लेषण करावे लागते. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर फायद्याचा ठरतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)