आनंदी वृद्धाश्रम!

अगदीच हाय-फाय नसलेल्या, सर्वसामान्य बजेटवाल्या वृद्धाश्रमात एक अनुभव नेहमी येतो. तिथले आजी आजोबा सांगतात, दोनच वस झालेत इथे राहायला येऊन. कोणी म्हणतात, पाच- सात दिवस झाले. प्रत्यक्ष ते अनेक महिने, अनेक वर्ष तिथे राहत असतात. पण असं बोलायला आवडत नाही त्यांना. काहींना खरोखर विस्मरण असतं. आपल्याला कोणी असो, नसो, आपण तात्पुरते कुठेतरी गेलो आहोत आणि तिथून परत जायचे आहे, ही आस चटका लावून जाते. वृद्धाश्रम म्हणजे टाकाऊ जागा नाही. असे विचार मनातून काढून टाकणे फार महत्वाचे असते.

हळूहळू वृद्धाश्रमांच्या सुविधेत चांगले बदल होतील येत्या काळात. सुधारणा करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही. एरवी गावोगावी, शहरो शहरी पाणी समस्या कशी भेडसावते ते आपल्याला माहित असते. आपण अनुभवलेले सुद्धा असते. धडधाकट माणसाने, कुटुंबाने रोजच्या वापराचे पाणी भरणे आणि वृद्धाश्रमात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना लागणारी एखाद दुसरी पाण्याची बादली पाणी टंचाईच्या काळात भरणे, ह्यात फार फरक आहे. सत्तर, पंच्याहत्तर, ऐंशी, पंच्याऐंशी वय मनात आणा. वेगवेगळ्या शारीर समस्या, व्याधी मनात आणा. अशावेळी कोणी कोणाचं पाणी भरायचं? गेले काही वर्षे सातत्याने विविध वृद्धाश्रमात जातेय. तिथली पाणी टंचाई फार अवघड असते, ते अनुभवतेय. त्यातही आजी आजोबांचे नळावर वाद होतात. वृद्धाश्रम व्यवस्थपनाला फार वेगवेगळी आव्हानं असतात. ह्या विषयात काही चांगले बदल करणे ही युद्धपातळीवर करायची गोष्ट आहे. हा एक मुद्दा झाला. अशा अनेक जीवनावश्‍यक मुद्‌द्‌यांवर वृद्धाश्रम सुविधेत येत्या काळात सकारात्मक बदल घडवावे लागणार आहेत.

आज जे तिशी चाळिशीत आहेत, त्यांनी सुद्धा पुढील तीस एक वर्षांची कल्पना करून ठेवली पाहिजे. माणसाचा आजचा भरवसा नाही, पुढचे कोणी पाहिले, हे बोलायला ठीक असते. पण कालचे गाठोडे मनातून काढून टाकून, उद्याचे भान ठेवूनच आज जगले पाहिजे. वृद्धाश्रमांविषयी मनात असलेल्या अढीवर देखील काम केले पाहिजे. ती काही टाकाऊ जागा नसते. आयुष्याच्या उत्तरार्धात समवयस्कांशी जोडून घेऊन छान मैत्र विकसित करायची देखील आनंदी जागा असू शकते ही!

– प्राची पाठक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)