हे झालं की ते करू सवय मोडाच!

हे झालं की ते करेन ह्या ट्रॅपमधून खासकरून तरुण मुलं, मुली, थर्ड जेंडर ह्यांनी बाहेर पडले पाहिजे. जे काय झकास करायचं ते आजपासून… आतापासून… झडझडून, झटझटून कामाला लागायचं. भरपूर मेहनत करायची, आपल्या कामाचा दर्जा आणि क्षितिज विस्तारत न्यायचे. त्याची खोली आणि उंची दोन्ही वाढवायची. विविध भाषा शिकायच्या. कोणत्याही कामाची माहिती करून घ्यायची. वरचेवर येणारे नैराश्‍य सहज पळून जाऊ शकते त्याने!

अमुक गोष्ट रोज करायला कोणी सांगितली की आपण परत कल्पनेचा धबधबा सुरू करतो मनात. असेच होईल, तसे होईल. हे जमणार नाही, ते अवघड आहे. एकट्याने कसे करू? सोबत पाहिजे. अमुक सोबत नकोच. तमुक झाले की ढमूक करू. मला नाहीच जमणार. असे अनेक अडथळे प्रत्यक्ष असो की नसो, आपल्या मनात आधीच येऊन गेलेले असतात. त्यांना आपण कसे सामोरे जातो, ह्यावर ते काम होईल की नाही, झाले तर कसे होईल आणि त्या ही पलिकडे जाऊन त्याचा आनंद आपण घेऊ शकू का? असे अनेक मुद्दे असतात. कामं टाळली जातात, ती ह्या ही मूळे. अनेकदा आपण काल्पनिक शक्‍यतांमध्येच वावरत असतो. वास्तव कदाचित त्याहून बरे आणि सुसह्य असू शकते. पण मनातच अडचणींचा डोंगर इतका मोठा करून ठेवलेला असतो की तो उपसण्यापेक्षा, तिथे भिडण्यापेक्षा ते काम टाळणे, तिथून पळ काढणे, पुढे ढकलणे जास्त सोयीचे वाटू लागते.

नजीकच्या भविष्यात अमुकच होईल आणि मग तमुक होईल, ह्या विचारांनी मन व्यापले जाते. हा असे म्हणेल आणि ती तशी वागेल, अशी गणिते सुरू राहतात. हे करायला गेलो, तर ते होईल आणि त्यातून अजून भलतेच काही घडेल अशी अवाजवी चिंता आपले मन पोखरत राहते आणि केवळ ह्या मनातल्या अडथळ्याला शरण जाऊन आपण ती एक गोष्ट करणे टाळत राहतो. तश्‍या प्रकारच्या इतरही अनेक गोष्टींसाठी मनाचे दार बंद करून ठेवतो. मग एखादी गोष्ट न करताच चिंता आणि चिंतेमुळे ताण वाढत जातो. ती गोष्ट करायची मजा दूरच राहते आणि मनातच शंभर शंका कोरल्या जातात. ते काम अतिशय निरस होऊन जाते. नवीन पैलू दिसू शकत नाहीत. मजा वाटत नाही. ते आहे त्यापेक्षा खूप अवघड वाटू लागते. तरीही ते करावे लागले, तर होईल-बघू- करू चक्र सुरू होतेच. म्हणूनच हे झालं की ते करू, ही सवय ठरवून मोडायला हवी!

– प्राची पाठक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)