असोला गाव जलसाक्षर करण्यासाठी तरूणाची धडपड

हिंगोली – दिवसेंदिवस होणारा अपुरा पाऊस यामुळे पाणी बचत करण्यासाठी हिंगोलीतील एका युवकाने गाव जलसाक्षर करण्याचा संकल्प केला असून गावात आतापर्यंत 27 शेतकऱ्यांच्या शेतात शेततळी केली आहेत. नागेश सुर्यवंशी असे या युवकाचे नाव असून तो कळमनुरी तालुक्‍यातील असोला गावचा रहिवासी आहे. या गावची लोकसंख्या दिड हजाराच्या आसपास आहे. गावात बहुतांश शेतकरी व शेतमजूर आहेत. नागेश सुर्यवंशी या युवकाने बारावीपर्यत शिक्षण घेवून वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला.

पांरपारिक शेती बरोबर बागायती शेती केल्यास त्याचा उपयोग चांगला होतो. मात्र यासाठी शेतीला पाण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी त्याने उमरा येथील उगम संस्था व पाणी फाऊंडेशनकडे प्रशिक्षण घेतले आहे. यानंतर त्याने कयाधु जलदिंडीत काम केले आहे. त्याची जलदुत म्हणून कळमनुरी तालुक्‍यात निवड झाली. त्यानंतर त्याने कृषी सहाय्यक संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंचनाबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी गावातील शेतकऱ्यांना मागच्या वर्षी शेततळ्याबाबत माहिती देणे सुरू केले.

दोन वर्षापासून शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले. यावर्षी स्वतः शेतकऱ्यांनी शेततळे करण्यासाठी पुढाकार घेतला व सध्या गावात 27 शेततळी पुर्ण झाली आहेत. एका शेतकऱ्याच्या शेततळ्याला पाणी देखील लागले आहे. शासनाने आता या शेतकऱ्याच्या तळ्यात टाकण्यासाठी प्लॅस्टीक उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे. मात्र त्याला पहिल्या वर्षी काहीच प्रतिसाद मिळाला नाही यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने जमिनीतीत पाणी पातळीत मोठी घट झाली आणि शेतकऱ्यांना शेततळ्याचे महत्व पटले.

शासनातर्फे मागेल त्याला शेततळे या योजनेचा आधार मिळाला. नागेशने स्वतःच्या शेतात शेततळे केल्यावर त्याने 18 शेतकऱ्यांच्या शेतात शेततळ्याचे काम सुरू केले. या शेतकऱ्यांच्या शेतात 27 शेततळी तयार केली. आता गावात शेततळ्याची संकल्पना शेतकऱ्यांना कळाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे करण्याचा निर्णय घेतला. नागेशच्या या उपक्रमामुळे कृषी सहाय्यक संतोष वाघमारे यांची देखील मदत मिळत आहे. पावसाळ्यात पडलेल्या पाण्याचा उपयोग या शेततळ्याला होणार असून त्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)