एक्‍स्प्रेस-वेवर आशिया खंडातील सर्वांत मोठा दरीपूल

6 कि.मी ने कमी होणार पुणे-मुंबईतील अंतर


25 मिनिटांचा प्रवासाचा वेळ वाचणार

पुणे – पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्‍टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधकामास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरूवात करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. दरम्यान, याठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठा दरीपूल बांधण्यात येणार आहे.

जबाबदारी “एमएसआरडीसी’कडे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हे दोन्ही कॉरिडॉर सुधारणा तथा देखभाल, दुरुस्तीसाठी “बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर 30 वर्षांत सवलतीच्या कालावधीसाठी शासनाने 1999 पासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केले आहे.

पावसाळ्यात बंद असते 1 लेन
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात आणि पुढे खंडाळा एक्‍झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्‍झिट ही रुंदी 6 पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्‍वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील 13.3 कि.मी च्या राहिलेल्या “मिसींग लिंक’मुळे मुंबईला लवकर पोहचणे शक्‍य होणार आहे.

असे कमी होणार अंतर
सध्यस्थिती लक्षात घेता द्रुतगती मार्गावरील कुसगाव ते खोपोली एक्‍झिट या भागातील 13.3 कि.मी लांबीच्या तसेच खोपोली इंटरचेंज ते खालापूर या अस्तित्वातील 5.86 कि.मी. लांबीच्या रस्ताचे 8 पदरीकरण करण्यात येणार आहे. दोन बोगदे व दोन दरीवरील पूल अशा एकूण 19.80 कि.मी लांबीचा 8 पदरी रस्ता बांधल्याने खोपोली एक्‍झिट ते कुसगाव हे 19 किमीचे अंतर 6 किमीने कमी होऊन 13.3 किमी इतके होणार आहे.

6 किमी वळण मार्गाला पर्याय
द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि महामार्गाला काही ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी महामंडळाकडून “मिसिंग लिंक ‘ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेली केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाची परवानगी आवश्‍यक होती. ही परवानगी महामंडळाला प्राप्त झाली आहे. या प्रकल्पामुळे बोर घाटातील 6 किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

असा असेल बोगदा आणि पूल
मिसिंग लिंक या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक केबल ब्रिज, खालापूर टोल ते खोपोली एक्‍झिटपर्यंत आठ पदरी रस्ता आणि दोन बोगदे आहेत. या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या केबल ब्रिजची लांबी 645 मी. आणि उंची 135 मी. असणार आहे. या पुलाच्या पुढे दोन बोगदे असणार आहे. पहिला बोगदा 1.6 किमी लांबीचा आणि दुसरा पूल 8.12 किमी लांबीचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)