आशियातील पहिले नोबेल विजेता राष्ट्रपुरूष रवींद्रनाथ टागोर

भयशून्य चित्त जेथ, उन्नत सदैव माथा
मम देशही जागृत होवो, या मुक्त स्वर्गी आता
हो अनिर्बंध हे ज्ञान ना संकुचिताची व्यथा
मम देशही जागृत होवो, या मुक्त स्वर्गी आता

या ओळी आहेत रवींद्रनाथ टागोर यांच्या जगप्रसिद्ध Where the Mind is Without Fear या कवितेतील. गितांजली या काव्यसंग्रहातील एकशे तीन कवितांपैकी ही एक कविता आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतंत्र भारत कसा असेल, याबद्दल आपली कल्पना मांडलेली आहे. त्यांच्या याच काव्यसंग्रहाला भारतातातील तसेच आशियातील पहिला नोबेल पुरस्कार 1913 साली मिळाला. नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय लोकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. ज्यामध्ये साहित्यासाठी मिळालेला हा एकमेव नोबेल पुरस्कार आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 मध्ये कलकत्ता येथे झाला. ते त्यांच्या आई वडिलांचे चौदावे अपत्य होते. अत्यंत सधन अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरामध्ये ब्राम्हो समाजाचे वातावरण असल्याकारणाने त्याचा नकळत परिणाम त्यांच्यावर झाला. नंतरच्या त्याच्या एकंदरीत काळामध्ये त्यांनी ब्राम्हो समाजाच्या वाढीसाठी आपले विचार मांडलेले आहेत.

लहानपणी घरामध्ये त्यांच्यावर नाट्य, कला, संगीत, शास्त्र आणि शिक्षणाचे संस्कार झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेल्या उपजत प्रतिभेला वाव देण्याची संधी त्यांना मिळाली. ज्यामाध्यमातून त्यांच्यातील एका मानवजातीच्या भल्यासाठी कार्यरत असणाऱ्या कलावंताचा जन्म झाला. त्यांचे साहित्य आज जगभर वाचले जाते. आयुष्यामध्ये आलेल्या वेगवेगळ्या अडचणींमधून मार्ग काढत त्यांनी जीवनाचा मार्ग यशस्वी बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला पाच वर्षाच्या काळामध्ये पत्नी, मुलगी आणि वडिलांच्या निधनामुळे त्यांना अतीव दु:ख झाले. आपल्या पत्नीच्या आठवणींना अभिवादन करताना त्यांनी स्मरण नावाचा कवितासंग्रह प्रसिद्ध केला.

साहित्याची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. या आपल्या साहित्य प्रेमापोटी इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेलेले टागोर हे आपले शिक्षण सोडून भारतात परत आले. नंतर साहित्याचा प्रचार, अध्ययन आणि प्रसारासाठी ते जगभर फिरले. प्रेमाने जग जिंकता येऊ शकते हा विचार त्यांनी मांडला. 1919 मध्ये झालेल्या जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला सर (नाईटहूड) हा किताब त्यांनी परत केला. शिक्षण, अध्यात्म, राष्ट्रीय चळवळ यामध्ये त्यांनी भरीव असे योगदान दिलेले आहे. स्वच्छता आणि गावांचा विकास यावर त्यांचा विशेष भर होता. विश्‍वभारतीच्या (शांतिनिकेतन) माध्यमातून त्यांनी जे कार्य सुरु केले ते आजही अव्याहतपणे चालू आहे. वेगवेगळ्या विषयातील प्राचीन भारतीय शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जावे, ही त्यांची इच्छा होती. अहिंसात्मक मार्गावर त्यांचा विश्‍वास होता. हिंदू मुस्लीम रक्षाबंधनाचे आयोजन तसेच धार्मिक ऐक्‍यासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले.

जन गण मन हे राष्ट्रगीत लिहून टागोरांनी संपूर्ण भारताला एकत्र बांधण्याचे महत्वपूर्ण कार्य केलेले आहे. आर्यसमाज, बौद्ध धर्म, वेद, उपनिषद यांचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे. तसेच ईश्‍वर सगळीकडे आहे, त्याला स्वतः मध्ये जागविण्याची गरज आहे असा विचार त्यांनी मांडला. जगभर प्रवास करीत वेगवेगळे प्रयोग करताना त्यांनी भारतीय संस्कृतीचे प्राधान्य जपले. अशा या जागतिक कीर्तीप्राप्त साहित्यिक, कलावंत, तत्वचिंतक, शिक्षणतज्ञ रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

– श्रीकांत येरूळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)