आशियाई स्पर्धा : राही सरनोबतला ऐतिहासिक सुवर्णपदक

आशियाई सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज


आशियाई क्रीडास्पर्धा : नेमबाजीत भारताची आगेकूच

पालेमबंग – राही सरनोबतने महिलांच्या 25 मीटर एअर पिस्तोल प्रकारांत सुवर्णपदकाला गवसणी घालताना येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत विक्रमी कामगिरी बजावली. गेल्या काही वर्षांपासून पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेल्या राहीने अंतिम फेरीतील दुहेरी “शूट-ऑफ’मध्ये नेत्रदीपक कामगिरी करताना आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरण्याचा मान मिळविला.

विशेष म्हणजे राही सरनोबतने सुवर्णपदकाच्या वाटचालीदरम्यान आशियाई स्पर्धाविक्रमाचीही नोंद केली. यंदाच्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. त्याचप्रमाणे आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णवेध घेणारी राही सहावी भारतीय नेमबाज ठरली. याआधी सौरभ चौधरी, जसपाल राणा, रणधीर सिंग, जितू राय व रोंजन सोधी यांनी ही कामगिरी केली आहे. याआधी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी भारताला कुस्तीत सोनेरी यश मिळवून दिले होते. तसेच षोडशवर्षीय सौरभ चौधरीने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारांत भारताला तिसऱ्या सुवर्णाची कमाई करून दिली होती.

वास्तविक पाहता सर्वांचे लक्ष असलेल्या मनू भाकरने महिलांच्या महिलांच्या 25 मीटर एअर पिस्तोल प्रकारांतील पात्रता फेरीत 593 गुणांच्या आशियाई स्पर्धाविक्रमाची नोंद करताना अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे तिच्याकडून सर्वांना पदकाची अपेक्षा होती. परंतु 16 वर्षीय मनूला अंतिम फेरीत आपली कामगिरी उंचावता आली नाही व ती सहाव्या क्रमांकावर फेकली गेली. याआधी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारातही मनू भाकरला अपयश आले होते.
दरम्यान मनू भाकरच्या पहिल्या पात्रता फेरीतील 297 गुणांच्या तुलनेत 288 गुणांची कामगिरी करणाऱ्या राही सरनोबतने नंतर आपला दर्जा उंचावला. अंतिम फेरीतील पहिल्याच मालिकेत राहीने 5 पैकी 5 लक्ष्यवेध केले. तर मनू भाकरला पाचपैकी 3 लक्ष्यांचाच वेध घेता आला व ती पाचव्या क्रमांकावर फेकली गेली. सहाव्या मालिकेनंतर राहीने 30 पैकी 25 लक्ष्यवेध करताना अग्रस्थान मिळविले, तर मनूचे आव्हान संपुष्टात आले.

अंतिम फेरी संपल्यावर राही सरनोबत आणि थायलंडची नेफास्वान यांगपाईबून या दोघी 34 गुणांसह बरोबरीत होत्या. त्यामुळे घेण्यात आलेल्या शूट-ऑफमध्ये दोघींनीही पाचपैकी चार लक्ष्यांचा वेध घेतला. त्यानंतर दुसऱ्या शूट-ऑफमध्ये सरस कामगिरी करताना 27 वर्षीय राहीने सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. जाकाबेरिंग शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्या दिवशी सुवर्णाची कमाई केली.

त्याआधी राहीने 2010 दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर विश्‍वचषक स्पर्धेत (2013) सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय पिस्तोल शूटर ठरलेल्या राहीला गेल्या वर्षी झालेल्या कोपराच्या दुखापतीमुळे आपले तंत्र आणि शैली बदलावी लागली. त्यानंतर राहीने जर्मनीचे दोन वेळचे जगज्जेते व ऑलिम्पिक विजेते मुन्खबायर दोर्जसुरेन यांना प्रशिक्षकपदी नियुक्‍त केले आणि त्यानंतरच तिची कामगिरी उंचावली.

अंजुम मौदगिलकडून निराशा
महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताची अव्वल नेमबाज अंजुम मौदगिल व गायत्री नित्यानंदम यांना पात्रता पेरीत प्रभावी सुरुवातीनंतरही अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयश आले. अंजुम मौदगिलने पात्रता फेरीत 786 गुणांची कामगिरी करताना जबरदस्त प्रारंभ केला होता. या वेळी अंजुम अग्रस्थानावर होती. परंतु अंतिम पात्रता फेरीत अंजुमला 1159 गुणांचीच नोंद करता आल्याने तिचे आव्हान अंतिम फेरीपूर्वीच संपुष्टात आले. गायत्री नित्यानंदमला 1148 गुणांचीच नोंद करता आल्याने तीही पात्रता फेरीचा उंबरठी ओलांडू शकली नाही.

भारतीय नेमबाजांचे वर्चस्व कायम
केवळ 16 वर्षे वयाच्या सौरभ चौधरीने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारांत सुवर्णपदक पटकावीत नेमबाजीत पहिले सोनेरी यश मिळवून दिले होते. तर अभिषेक वर्माने त्याच प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचप्रमाणे अनुभवी नेमबाज संजीव राजपूतने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारांत रौप्यपदक जिंकताना भारताचे नेमबाजीतील वर्चस्व कायम राखले होते. तत्पूर्वी अपूर्वी चांडेला आणि रविकुमार यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारातील मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक मिळवून देताना देशासाठी नेमबाजीतील पहिले पदक जिंकले होते. केवळ 20 वर्षे वयाच्या लक्ष्य शेवरानने 45 पैकी 39 गुणांची कमाई करताना अत्यंत आव्हानात्मक अशा पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताला इतिहासातील तिसरे रौप्यपदक मिळवून दिले. त्यानंतर भारताचा अनुभवी नेमबाज दीपक कुमारने पिछाडीवरून जबरदस्त पुनरागमन करताना पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारांत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. पाठोपाठ लक्ष्य शेवरानने पुरुषांच्या ट्रॅप प्रकारांत रौप्यपदक पटकावताना भारताला नेमबाजीत तिसऱ्या पदकाची कमाई करून दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)