पुणे – इंडोनेशियात झालेल्या कनिष्ठ आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत येथील महिला आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू आकांक्षा हगवणे हिने एक रौप्य व एक ब्रॉंझपदकाची कमाई केली. तिने या स्पर्धेतील क्लासिकल विभागात तिसरे स्थान घेतले तर ब्लिट्झ विभागात तिला रौप्यपदक मिळाले.
या स्पर्धेतील ब्लिट्झ विभागात कझाकिस्तानची नुरगाली नाझर्के व आकांक्षा यांचे प्रत्येकी सहा गुण झाले. मात्र प्रगत गुणांच्या निकषात आकांक्षाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. क्लासिकल विभागात तिने नऊ फेऱ्यांमध्ये साडेसहा गुण मिळविले. त्यामध्ये तिने 4 डाव जिंकले व 5 डावांमध्ये बरोबरी स्वीकारली. कझाकिस्तानची सेरीकबे व भारताची वंतिका अग्रवाल यांचे प्रत्येकी सात गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे पहिले दोन क्रमांक देण्यात आले. या स्पर्धेत दहा देशांचे खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेतील दोन पदकांसह आकांक्षाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकांची संख्या 23 वर नेली आहे. ती गेली बारा वर्षे शिवछत्रपती पुरस्कार विजेते फिडे प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती यशवंतराव मोहिते महाविद्यालयात शिकत आहे. ती पुढील महिन्यात अबुधाबी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत तिला महिला ग्रॅंडमास्टर किताबाचा दुसरा निकष पूर्ण करण्याची संधी आहे.