साताऱ्यात अशोक कामटेंचा वाढदिवस साजरा

सातारा – साताऱ्यात पोलीस दलातील अशोक कामटेंचा वाढदिवस साजरा झाला.अनेकांना हे वाचून आश्‍चर्य वाटले असेल परंतु अशोक कामटे हे साताऱ्यात देखील एक आहेत. निवृत्त सहाय्यक फौजदार अशोक दत्तात्रय कामटे, जे आजही पोलीस दलाची शान आहे. कारण, शहीद कामटे साहेबांचे सारथी म्हणून ते परिचित झाले आहेत.

26/11 च्या हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कामटे हे शहीद झाले होते. त्यांच्याच नावाचा एक पोलीस अधिकारी साताऱ्यात देखील कार्यरत होते. त्यांना सेवानिवृत्त होऊन आठ वर्षे झाली आहेत. त्या अशोक कामटेंच्या घरगुती वातावरणात वाढदिवस बुधवारी झाला. त्याच्या जुन्या कार्याला उजाळा देताना अनेक वेगवेगळी माहिती उपलब्ध झाली.
साताऱ्यात 1992 साली अशोक कामटे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले त्या वेळी त्यांच्या गाडीचा चालक कोण? हे ठरवताना पोलिस अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत होती. त्या वेळेस कराड शहर पोलिस ठाण्यात चालक म्हणून पुरंदर तालुक्‍यातील चाबळी येथील मूळ रहिवाशी असलेले अशोक कामटे नावाचा एक चालक होता.

खुद्द अशोक कामटे यांना याबाबत समजले त्यावेळी त्यांनी कराड शहरवरून चालक अशोक कामटे यांना बोलावून घेतले व माझ्याच नावाचा एक अशोक कामटे सातारा देखील आहे हे पाहून आनंद वाटला असे सांगून आजपासून माझ्या गाडीचे चालक तुम्ही असे म्हणून या अशोक कामटेंना आपल्या गाडीचा चालक केले. 1992 ते 1993 या कालावधीत सातारच्या अशोक कामटेनी या वरिष्ठ अधिकारी अशोक कामटेचे सारथ्य केलं. या अशोक कामटेंचा बुधवारी त्यांच्या जुन्या सहकारांनी साताऱ्यात वाढदिवस साजरा केला.

त्या वेळी हे अशोक कामटे भूतकाळात जाऊन बोलताना अनेकदा गहिवरले ते म्हणाले, अशोक कामटेंच्या पूर्वी दहिवडी भागात त्याकाळी पंतप्रधान राजीव गांधी आले होते. त्यांच्या उघड्या जीपवर सारथ्य करायला याच अशोक कामटेना नेमले होते. त्या वेळी राजीव गांधीही त्यांच्या गाडी चालवणीच्या कलेवर खूश झाले होते. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, विजयसिंह मोहीते पाटील यांच्या गाडीवर त्यांनी चालक म्हणून काम केले आहे. आज वयाची 66 वर्ष पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्त हून 8 वर्षे झाल्यानंतर त्यांना एवढ्या मान्यवरांचं आपण सारथ्य केले याचा अभिमान वाटत आहे.

आबांनी मागितली तंबाखू अन्‌ कामटेंनी दिला नकार

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा यांच्या गाडीचे सारथ्य अशोक कामटे करत होते. त्यावेळी आबांना तंबाखूची तलफ आली. आबांनी कामटे यांना तंबाखूची मागणी केली. परंतु त्यांनी नम्रपणे नकार दिला परंतु एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा आबांनी मागणी केल्यानंतर आपल्या गृहमंत्र्यांना नाराज करू नये म्हणून कामटेंनी गाडी थांबवली. व आपल्या लाडक्‍या गृहमंत्र्यांची मागणी पुरवली होती. त्याच वेळी आबांनी तंबाखू सोडण्याचा निर्णय घेतला होता. ही आठवण सांगताना त्यांच्या समवेत पोलीस अधिकारी आर. एस. पटेल, के. डी. कारंडे उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)