अरूण जेटली – सरकारचा या प्रकरणाशी संबंध नाही 

File photo..

दक्षता आयोगाच्या शिफारशीवरून कारवाई केली

नवी दिल्ली  – सीबीआयमधील दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी एकमेकांवर केलेले आरोप आणि त्यानंतर सीबीआयमधील अधिकाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई या संबंधात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारची बाजू मांडली. ते म्हणाले की सीबीआय ही स्वायत्त संस्था आहे त्यातील अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केंद्रीय दक्षता आयोगाने केली होती त्यानुसार सरकारने ही कारवाई केली आहे.

सीबीआय संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी ही कारवाई करणे आवश्‍यक होते याखेरीज सरकारचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की सीबीआयच्या या दोन्ही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी एकमेकांवर लाचखोरीचे आरोप केले आहेत. त्या विषयीचा तपशील दक्षता आयोगाकडे पाठवण्यात आला. त्यांनी त्याचा अभ्यास करून सरकारला त्यांच्यावर सक्तीच्या रजेवर पाठवण्याची व चौकशी पुर्ण होईपर्यंत पदावरून हटवण्याची शिफारस केली त्यानुसार सरकारने काल रात्री हा निर्णय घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीबीआयमधील हे प्रकरण गंभीर आणि दुर्देवी आहे असे ते म्हणाले. या अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून दूर केल्या खेरीज त्यांच्यावरील चौकशी केली जाऊ शकत नाही त्यामुळे ही कारवाई आवश्‍यक ठरली आहे. सीबीआय प्रमुख अलोक वर्मा हे राफेलशी संबंधीत कागदपत्रे जमवत होते म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याच्या आरोपात तथ्य नाही असेही ते म्हणाले. सीबीआय मधील दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांनीच एकमेकांवर हे आरोप केल्यामुळे त्यांची चौकशी कोण करणार हा प्रश्‍न होता. सरकार ही चौकशी करू शकत नाही कारण हा विषय सरकारच्या अखत्यारीत येत नाही असेहीं त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

सीबीआयचीच विश्‍वासार्हता या अधिकाऱ्यांमुळे धोक्‍यात येत असेल आणि विदेशात पळून गेलेले आरोपी त्या अनुषंगाने सीबीआयवरच बोट दाखवून काही आक्षेप घेणार असतील तर त्या अधिकाऱ्यांना हटवणे आवश्‍यकच ठरले होते तशी शिफारस दक्षता आयोगानेही केली होती त्यामुळे ही कारवाई करणे भाग पडले असे त्यांनी पुन:पुन्हा स्पष्ट केले. या अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर कायम ठेऊन त्यांनाच एकमेकांची चौकशी सुरू करण्याची अनुमती देणे शक्‍य नव्हते असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)