आरोग्य : चर्चा हस्ताक्षराची (भाग-2)

-नरेंद्र क्षीरसागर

सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर जो अहवाल सादर केला जातो, त्यात डॉक्‍टरांचे अक्षर वाचता येत नसल्यामुळे न्यायदानात अडथळे येत असल्याचे खुद्द एका उच्च न्यायालयानेच म्हटले आहे. शवविच्छेदन अहवालातील सर्व रकाने संगणकाद्वारे भरले जावेत आणि डॉक्‍टरांनी केवळ त्यावर स्वाक्षरी करावी, असे निर्देश देण्यात आले असून, न्यायदानाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी ते आवश्‍यकही आहे. त्यासाठी शवविच्छेदनाशी संलग्न रुग्णालयात संगणक, सॉफ्टवेअर आणि प्रशिक्षणाची सुविधा करावी लागणार आहे.

पोलीस दल सक्षम करण्यासाठी आयोगांची स्थापना झाली आहे. त्यातील अनेक आयोगांनी अशी शिफारस केली आहे की, गुन्हा दाखल करणे आणि गुन्ह्याचा तपास करणे ही वेगवेगळी कामे असून, ती वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे सोपविली गेली पाहिजेत. त्याचप्रमाणे आपापल्या कामात निष्णात बनण्यासाठी पोलिसांना स्वतंत्र प्रशिक्षणही दिले पाहिजे.

प्रशिक्षणामुळे पोलिसांमधील कमतरता त्यांच्याच लक्षात येतील आणि त्यामुळे गुन्हेगारांचाच कसा फायदा होतो, हेही लक्षात येईल. अर्थात, ही सर्व प्रक्रिया राबविताना, खोटेपणा आणि अप्रामाणिकपणामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये, याचेही भान राखायला हवे.

एखाद्या व्यक्तीला निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यासाठी त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या नोंदी हा निकष मानला जावा, हा मुद्दा जेव्हा चर्चेला आला आणि संसदेनेही त्यावर विचारविनिमय केला, तेव्हा असे दिसून आले की कमीत कमी राजकीय व्यक्तींच्या बाबतीत तरी खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाली आहे.

विशिष्ट व्यक्तींना राजकारणात येण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, असेही त्यावेळी बोलले गेले. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीला ती दोषी सिद्ध होईपर्यंत निवडणूक लढविण्यापासून वंचित ठेवले, तर ते अन्याय्य ठरेल, असेच सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखाने सांगितले होते.

असो, मुख्य मुद्दा डॉक्‍टरांच्या हस्ताक्षराचा आहे. एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोषी मानून शिक्षा देण्याच्या प्रक्रियेत डॉक्‍टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. या अहवालांवर न्यायालये विश्‍वास ठेवतात. काही मोजक्‍या प्रकरणांमध्येच सक्षम अधिकारी एकापेक्षा अधिक डॉक्‍टरांची नियुक्ती शवविच्छेदनासाठी करतात. अशा प्रकारे एकापेक्षा अधिक डॉक्‍टरांची नियुक्ती केल्यामुळे पक्षपाताची शक्‍यता कमी होते.

अनेकदा शवविच्छेदन करण्यास विलंब होतो, कारण डॉक्‍टर आपले निर्धारित काम पूर्ण केल्याखेरीज शवविच्छेदनासाठी वेळ देऊ शकत नाहीत. डॉक्‍टरांची संख्या कमी असल्यामुळेही कधीकधी शवविच्छेदनास विलंब होतो. वाढत्या संख्येने येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणे, त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेणे, औषधे लिहून देणे अशा नियमित कामातून वेळ काढूनच डॉक्‍टर शवविच्छेदन करतात. सरकारी रुग्णालयांमध्ये तर एका डॉक्‍टरसमोर शेकडो रुग्ण रांग लावून उभे असतात.

प्रत्येक रुग्णाच्या तपासणीला विशिष्ट अवधी लागतोच. हा अपेक्षित अवधीही डॉक्‍टर रुग्णांना देऊ शकत नाहीत. अशा स्थितीत रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान होऊन योग्य औषध दिले जाईल का, अशीही कधीकधी शंका वाटते, ती डॉक्‍टरांसमोरील रांग पाहूनच!

आरोग्य : चर्चा हस्ताक्षराची (भाग-1)  आरोग्य : चर्चा हस्ताक्षराची (भाग-3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)