#व्यक्तिमत्व : रेडीमेड गणेशोत्सव ( भाग २)

#व्यक्तिमत्व : रेडीमेड गणेशोत्सव ( भाग १)

-सागर ननावरे 

गेल्या वर्षीचा गणेशोत्सवाचा प्रसंग. गणपती विक्रीच्या दुकानांत तुडूंब गर्दी झाली होती. वेगवेगळ्या रूपांतील आकर्षक गणपती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. मंडळाच्या गणपतीच्या मंडपासमोर मोठ्या आवाजात भक्तिगीतांचा गजर सुरू होता. लहान मुले डोक्‍याला ‘गणपती बाप्पा मोरया’ नावाच्या भगव्या पट्ट्या बांधून मधूनच मंगलमूर्ती मोरया….. चा जयघोष करीत होती. एकूणच सारे वातावरण कसे प्रसन्न आणि मंगलमय वाटत होते.

पूर्वी गणेशोत्सव म्हटले की आनंदाला उधाण यायचे. प्रत्येक गोष्ट हाताने आणि कलाकुसरीने केली जायची. मात्र, जसजसा काळ सरू लागला तसतशी गणपती उत्सवाची पद्धतही बदलू लागली. पूर्वी गणपती बाप्पाला आणण्यासाठी महिनाभर आधीपासूनच चढाओढ लागलेली असायची. आता मात्र ऐन गणपती बसण्याच्या दिवशी सर्व गोष्टींची रेडीमेड खरेदी केली जाते.आठवडाभर आधीपासूनच आरास स्वतःच्या हातांनी तयार करून सजवली जायची. आता मात्र आयती म्हणजेच रेडीमेड रंगीबेरंगी सजावटीची आरास काही मिनिटांत खरेदी केली जाते.त्यामुळे नवनिर्मितीचा आणि कलाकुसरीचा खराखुरा आनंद आता विकतही मिळत नाही.

पूर्वी घरातील स्त्रिया आपल्या हाताने उकडीचे मोदक गणपती बाप्पासाठी करत असे. स्वास्थ्यासाठी उत्तम आणि चवीला रुचकर असणारे ते मोदक आता बहुतेक ठिकाणी दिसत नाहीत. कारण मिठाईच्या दुकानातील भेसळयुक्त खव्याचे वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक आज सर्रास घरोघरी विकत आणले जातात. आणि यापुढेही सांगायचे झाल्यास पूर्वी श्रीगणेशाची आरती प्रत्येकाची तोंडपाठ असायची. पंचारती ओवाळताना आणि ती स्वतः गुणगुणताना कमालीचा भक्तिभाव उत्पन्न व्हायचा. परंतु आज काल टेप,डीव्हीडी किंवा ऑडीओवर आरती लावून केवळ हलत्या देखाव्यासारखे उभे राहून भक्तिमय वातावरण तयार केल्याचा कृत्रिम अविर्भाव जागृत करीत असतो.

मित्रांनो, सण-उत्सव आपल्या परंपरागत संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. यात आपण सर्वांनी केवळ शरीराने सहभागी न होता चांगल्या अंतःकरणाने सहभागी झाले पाहिजे. मिरवणुकीचा आनंद भाजी खात घरात टीव्हीवर पाहण्यापेक्षा स्वतः त्यात सामील होऊन घेता आला पाहिजे. कर्तव्य,जबाबदाऱ्या आणि स्वप्नांच्या मागे धावताना थोडा वेळ स्वतःसाठी कुटुंबासाठी किंबहुना संस्कृतीच्या संवर्धनासाठी दिला पाहिजे. मित्रांनो गणेशोत्सव दोन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. केवळ “आतुरता तुझ्या आगमनाची” असे स्टेट्‌स ठेवून काहीही होणार नाही.

प्रत्यक्षात स्वतः हिरीरीने आणि चैतन्याने सहभागी होऊन या आनंदाच्या उत्सवाची रंगत वाढवता आली पाहिजे. आपण जर असा रेडीमेड गणेशोत्सव साजरा करू लागलो तर आपल्या पुढच्या पिढीकडे आपला वारसा कसा जाणार ? म्हणूनच आता ही परिस्थिती बदल्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आणि ती आपल्याला जबाबदारीने आणि उत्साहाने पार पडायची आहे. आपल्या संस्कृतीचा विस्तार आणि विचार करणे हे आपल्याच हाती आहे. चला तर मग परंपरेचा मान ठेवून आणि स्वतः पुढाकार घेऊन यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्‍यात साजरा करूया.

चला गणपती बाप्पा मोरया…..मंगलमूर्ती मोरया !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)