#विशेष लेख : अमेरिकेचा ‘याॅर्कर’, इम्रानची कोंडी (भाग १)

-अभय कुलकर्णी

गेल्या काही दिवसांत ट्रम्प प्रशासन आणि पाकिस्तानचे इम्रान सरकार यांच्यात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून शाब्दिक वाद उद्‌भवत आहेत. आता अखेरीस ट्रम्प सरकारने पाकिस्तानला दिली जाणारी 2100 कोटींची मदत रोखण्याचा निर्णय घेऊन अनपेक्षित यॉर्कर टाकला आहे. प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानची आणि पर्यायाने नवपंतप्रधान इम्रान खान यांची यामुळे मोठी कोंडी झाली आहे.

पाकिस्तानच्या नवनिर्वाचित सरकारला सुरुवातीच्या काळातच जबर झटका बसला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या 2100 कोटी रुपयांच्या मदतीवर निर्बंध घातले आहेत. पाकिस्तानने देशातंर्गत दहशतवाद्यांवर अंकुश बसवावा या हेतूने ट्रम्प सरकारने मदतनिधी रोखल्याचे मानले जात आहे.

यासंदर्भात अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी स्पष्टपणाने म्हटले आहे की, अमेरिकी प्रशासनाचा अजेंडा स्वच्छ आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना लगाम घालावा आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी. अमेरिकेने यासाठी पाकिस्तानला अनेक संधी दिल्या आहेत.

अमेरिकेच्या कारवाईबाबत भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनीही टिप्पणी केली आहे. ते म्हणतात, अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखून मोठे काम केले आहे. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे थांबविले नाही तर पाकिस्तानला भविष्यात अशाच प्रकारचे धक्के सहन करावे लागतील.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोडकळीस येत असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान सरकारला धक्‍का दिला आहे. या निर्णयाला व्हाइट हाऊसने दुजोरा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानबाबत मोठा निर्णय घेण्यापासून कचरत असलेल्या अमेरिकी प्रशासनाने अखेर धाडसी पाऊल टाकले आहे. आता अमेरिकेकडून होणारी ही मदत पुन्हा सुरू करायची असेल तर पाकिस्तानला दहशतवाद्यांविरुद्ध कडक भूमिका घ्यावी लागणार आहे.

यापूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या आश्रयावरून खडे बोल सुनावले होते. कारण इम्रान सरकार हे पाकिस्तानच्या अगोदरच्या सरकारप्रमाणेच दहशतवाद्यांबाबत मवाळ भूमिका घेत असल्याचे निरीक्षण ट्रम्प प्रशासनाने नोंदवले. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहिल्यास ट्रम्प प्रशासन आणि पाकिस्तानचे इम्रान सरकार यांच्यात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून शाब्दिक वाद उद्‌भवत आहेत.

काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांवरून उभय देशांत ताणतणाव पाहावयास मिळाला होता. परिणामस्वरुप ट्रम्प सरकारने पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याचा निर्णय घेतला. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेप्टनंट कर्नल कोनी फॉकनर यांनी पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतनिधीचा वापर आता संरक्षण विभाग प्राथमिक गरजा भागवण्यासाठी करेल, असे म्हटले आहे.

#विशेष लेख : अमेरिकेचा ‘याॅर्कर’ इम्रानची कोंडी (भाग २)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)