अभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 3)

-डाॅ. चैतन्य जोशी 

दिवाळीचा उत्सव आणि अभ्यंगस्नान यांचं अतूट असं नातं आहे. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशात दैनंदिन स्नान हे गरजेचेच ठरते. मग हे स्नान आरोग्यदायी आणि त्वचेला संजीवनी देणारे कसे ठरेल, याचा विचार भारतीय परंपरेत केला गेला आहे. स्नान म्हणजे केवळ पाणी-साबणाने आंघोळ करणे, इतका मर्यादित अर्थ यामध्ये अजिबात नाही. त्यामध्ये त्वचेचा उजाळा, घर्मरंध्रांची स्वच्छता, नखे, केस यामधील धुलिकणांचे निर्मूलन आणि संपूर्ण त्वचेला तेलाने मर्दन, मग उटण्याने त्वचेला घासून मृतवत्‌ झालेली बाह्यत्वचा काढून टाकणे अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश असतो.

अभ्यंग स्नानाचे महत्व आणि फायदे –

दिवाळीच्या पहिल्या दिवशी केले जाणारे अभ्यंगस्नान आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हितकारक आहे. पारंपरिकता जपणे याबरोबरच आरोग्याचे जतन करणे हा या अभ्यंगस्नानामागील विशेष हेतू आहे. दिवाळीच्या प्रकाशाच्या सणाला आरोग्याची जोड देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला जातो. आयुष्यात असणाऱ्या अडचणी, संकटे हे या अभ्यंगस्नानाबरोबर धुवून टाकले जातात. बाह्यजग प्रकाशमय करण्याबरोबरच अंतर्मनातही प्रकाशाचा दिवा लावण्याचे काम यामार्फत केले जाते.

आयुर्वेदातील चरकसंहिता, सुश्रूत संहिता आणि अष्टांग हृदय यामध्ये अभ्यंगस्नानाचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे अनेक फायदे सांगितलेले आहेत.

1. अभ्यंगस्नान शरीराचे रक्‍ताभिसरण वाढविण्यास मदत करते.
2. त्वचेवरील मृत पेशी घालविण्यास मदत होते.
3. त्वचा अगदी मुलायम आणि नरम बनवते. रंगही उजळण्यास मदत करते.
4. अभ्यंगासाठी वापरल्या जाणाऱ्या सुगंधित तेलाने मन शांत आणि स्थिर होण्यास मदत होते.
5. त्वचेचे वय स्थिर ठेवण्यास मदत करते.
6. डोळ्यांची दृष्टी निरोगी ठेवण्यास मदत करते.
7. निद्रानाश अथवा तत्सम विकार नाहीसे करते. चांगली झोप लागण्यास मदत करते.
8. हात आणि पाय यांना मोकळे करून खंबीरपणा देते.
9. शरीरातील धातूंचा जोम आणि क्रियाशीलता वाढविण्यास मदत करते.
10. आंतरेंद्रिये आणि बाह्येंद्रिये यांना उत्तेजित बनवते.
11. वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखण्यास मदत करते.
12. तेलाच्या मालिशमुळे केस निरोगी आणि दाट आणि नरम होण्यास मदत होते.

अभ्यंगस्नानामधील प्रक्रियेने एकंदरीतच संपूर्ण शरीराला शांतता आणि स्थिरता मिळण्यास मदत होते. त्वचा निरोगी आणि सतेज होण्यासही मदत होते. आपल्याकडे साजऱ्या होणाऱ्या उत्सवांना परंपरेबरोबरच आरोग्य आणि संपन्नतेचीही पार्श्‍वभूमी आहे.

आपल्या संस्कृतीनुसार साजरा केल्या जाणाऱ्या प्रत्येक सण उत्सव साजरा करण्यामागे काही शास्त्रीय, वैज्ञानिक अथवा पारंपरिक कारणे निश्‍चितच असतात. त्या कारणांना समजून घेऊन यानंतरचा प्रत्येक सण जाणीवपूर्वक साजरा करण्याचा संकल्प यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने करूया.

अभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 1)   अभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 2)  


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)