अभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 2)

-डाॅ. चैतन्य जोशी 

दिवाळीचा उत्सव आणि अभ्यंगस्नान यांचं अतूट असं नातं आहे. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशात दैनंदिन स्नान हे गरजेचेच ठरते. मग हे स्नान आरोग्यदायी आणि त्वचेला संजीवनी देणारे कसे ठरेल, याचा विचार भारतीय परंपरेत केला गेला आहे. स्नान म्हणजे केवळ पाणी-साबणाने आंघोळ करणे, इतका मर्यादित अर्थ यामध्ये अजिबात नाही. त्यामध्ये त्वचेचा उजाळा, घर्मरंध्रांची स्वच्छता, नखे, केस यामधील धुलिकणांचे निर्मूलन आणि संपूर्ण त्वचेला तेलाने मर्दन, मग उटण्याने त्वचेला घासून मृतवत्‌ झालेली बाह्यत्वचा काढून टाकणे अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश असतो.

उटणे आणि सुगंधित तेल

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तज्ञांच्या मते आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास दररोज अभ्यंगस्नान करायला हवे. अभ्यंगस्नानामध्ये दिवाळीत वापरले जाणारे सुगंधी उटणे किंवा उपटन यालाही विशेष महत्त्व आहे. उटणे हा नैसर्गिक स्नानामधील राजा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संपूर्णत: नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या या उटण्याला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. त्वचेसाठी अत्यंत फायद्याचे असलेले हे उटणे शरीरावरील मृत त्वचा नष्ट करून त्वचा मऊ आणि तेजस्वी बनवते.

चंदन, कापूर, मंजिष्ठा, हळद यांसारखे त्वचेचे आयुष्य वाढवणारे घटक या उटण्यामध्ये असतात. त्याचप्रमाणे अभ्यंग स्नानात विशेष महत्त्व असते ते सुगंधित तेलाला. सुगंधित तेल मनाला तसेच मेंदूला शांत करण्याचे काम करते. तेलाच्या सुगंधामुळे शरीर आणि मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.

दिवाळीच्या अभ्यंगस्नानाच्या वेळी कोणतेही सुगंधी तेल वापरल्यास त्याचा फायदाच होतो. प्राथमिकतेने बदामाचे तेल वापरणे हितकारक ठरते. बदाम हे व्हिटॅमिन इ युक्‍त असते आणि निरोगी त्वचेसाठी व्हिटॅमिन इ अत्यंत उपयोगी असते.

अभ्यंगस्नान करताना पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे, सुगंधित तेल गरम करून संपूर्ण शरीराला त्या तेलाने मालिश करावी. अर्धा तास ते तेल शरीरात मुरवावे. स्नान करताना प्रथम उटणे अंगाला लावावे. त्याबरोबर बेसन पीठाचा उपयोग करणेही फायद्याचे ठरते. या मिश्रणाने संपूर्ण शरीराला व्यवस्थित मालिश करून नंतर गरम पाण्याने स्नान केले जाते.

सामान्यत: नंतर साबण वापरावयाचा झाल्यास तो चंदन किंवा हळदी यांसाख्या घटकांनी युक्‍त असलेला असल्यास अभ्यंगाचे फायदे आणखी वाढतात.

अभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 1)   अभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 3)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)