अभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 1)

-डाॅ. चैतन्य जोशी 

दिवाळीचा उत्सव आणि अभ्यंगस्नान यांचं अतूट असं नातं आहे. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशात दैनंदिन स्नान हे गरजेचेच ठरते. मग हे स्नान आरोग्यदायी आणि त्वचेला संजीवनी देणारे कसे ठरेल, याचा विचार भारतीय परंपरेत केला गेला आहे. स्नान म्हणजे केवळ पाणी-साबणाने आंघोळ करणे, इतका मर्यादित अर्थ यामध्ये अजिबात नाही. त्यामध्ये त्वचेचा उजाळा, घर्मरंध्रांची स्वच्छता, नखे, केस यामधील धुलिकणांचे निर्मूलन आणि संपूर्ण त्वचेला तेलाने मर्दन, मग उटण्याने त्वचेला घासून मृतवत्‌ झालेली बाह्यत्वचा काढून टाकणे अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश असतो.

अभ्यंग हा आयुर्वेद शास्त्रातील एक उपचाराचा प्रकार आहे. यामध्ये शरीराला विश्रांती, शांतता आणि स्थिरता मिळावी यासाठी संपूर्ण शरीराला गरम तेलाने मालिश केली जाते. यासाठी वापरले जाणारे तेल हे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक घटकयुक्‍त तसेच विशिष्ट क्रिया करून बनविलेले असते. बऱ्याच वेळेस आयुर्वेदातील पंचकर्म उपचार करताना अभ्यंग ही त्याची प्राथमिक क्रिया अथवा पूर्वक्रिया म्हणून केली जाते.

सामान्यत: मोहरी, तीळ, सूर्यफूल, खोबरे आणि बदाम यांचे तेल अभ्यंगासाठी वापरले जाते. विशेषत: त्या त्या ऋतूंमध्ये यापैकी शरीराला मानवणारे तेल वापरतात. अलीकडील काळात अभ्यंग मालिश करताना आयुर्वेदातील पारंपरिक पद्धतींबरोबरच शरीराला उपयुक्‍त असणाऱ्या काही पाश्‍चिमात्य मालिशच्या प्रकारांचाही अवलंब केला जातो.

दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण असतो. दिवाळी म्हटले की आठवण होते ती लहानपणीची. पहाटे लवकर उठून अंगाला तेल लावून गरम पाण्याने आईने घातलेले स्नान, तिच्या शेजारी बसून काढलेली रांगोळी, लाडू, करंजी, चिवडा यांवर मारलेला ताव, फटाक्‍यांची धमाल आणि असे बरेच काही. दिवाळी म्हणजे आकाशकंदिलांनी उजळलेले प्रत्येक घर, फराळाची देवाण-घेवाण, शुभेच्छांचा पाऊस आणि पहाटे उठून केलेले अभ्यंगस्नान.

नरकचतुर्दशी हा दिवाळीचा मुख्यत्वे पहिला आणि इतर पाच दिवसांपैकी सर्वात महत्त्वाचा दिवस समजला जातो. या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या असुराचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. त्यामुळे अमंगलावर मंगलाचा विजय हे या दिवसाचे महत्त्व. या दिवशी पहाटे उठून केलेले स्नान हे अमंगलाचा अंत केल्याचे प्रतीक मानले जाते.

हे अभ्यंगस्नान पहाटे सूर्योदयापूर्वी करणे म्हणजे गंगेमध्ये स्नान करण्यासारखे आहे असेही समजले जाते. दिवाळीमध्ये अभ्यंगस्नानाचे जसे पारंपरिक महत्त्व आहे, तसेच ते आरोग्याच्या दृष्टीनेही आहे. दिवाळी साजरी करताना हे अभ्यंगस्नान पारंपरिक प्रथेबरोबरच आरोग्यदायी कसे आहे, त्याची पद्धत आणि महत्त्व अशा सर्व अंगांनी त्याची माहिती असणे आवश्‍यक आहे.

अभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 2)   अभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)