#CWC2019 : ते हरले, ते जिंकले

चाहत्यांकडून अफगाणिस्तानचे कौतुक

पुणे – अफगाणिस्तान म्हटले की आपल्या डोळ्यासमोर लगेचच दहशतवादी कारवायांचा अड्डा असेच चित्र उभे राहते. मात्र अशा प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करीत व त्या पलीकडे जाऊन तेथेही क्रिकेटचे नैपुण्य आहे हे त्यांच्या संघाने दाखवून दिले आहे. भलेही त्यांना विश्‍वचषक स्पर्धेतील नऊच्या नऊ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी भारत व पाकिस्तान या दोन बलाढ्य संघांना दिलेली लढत संस्मरणीयच ठरली आहे. अर्थात चांगले यश मिळविण्यासाठी त्यांना खूपच कष्ट करावे लागणार आहे.

अफगाणिस्तानने या स्पर्धेच्या पात्रता फेरीत वेस्ट इंडिजसारख्या अनुभवी संघाविरूद्ध दोन्ही साखळी सामने जिंकले होते. या पार्श्‍वभूमीवर इंग्लंडमधील विश्‍वचषकाच्या मुख्य स्पर्धेत त्यांच्याकडून अनपेक्षित कामगिरीची अपेक्षा होती. त्यांना पात्रता फेरीतील चमकदार यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. तरीही त्यांच्या खेळाडूंकडे जागतिक स्तरावरील स्पर्धेची गुणवत्ता आहे याचा प्रत्यय त्यांनी घडविला आहे. जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण यश मिळविण्यासाठी आवश्‍यक असणारा स्पर्धात्मक अनुभव, व्याबसायिक व सकारात्मक वृत्ती, अव्वन दर्जाचे प्रशिक्षण याचा अभाव त्यांच्या खेळाडूंमध्ये दिसून आला. विशेषत: विजयाची संधीच्याजवळ पोहोचल्यानंतर त्याचे रुपांतर विजयात करण्यासाठी आवश्‍यक असणारी कल्पकता व कुशल नेतृत्व याचाही अभावच त्यांच्यात जाणविला. त्यामुळेच भारत व पाकिस्तानविरूद्ध त्यांना विजयाच्या उंबरठ्यावरून परतावे लागले.

भारताविरूद्धच्या लढतीत मोहम्मद नबी याला संयम ठेवता आला नाही. त्याने थोडीशी चिकाटी दाखविली असती तर कदाचित त्यांच्या संघास विजय मिळविता आला असता. तसेच त्याला रशीद खान, कर्णधार गुलाबद्दिन नईब आदी खेळाडूंनी दुसऱ्या बाजूने साथ देण्याची गरज होती. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात आपली गोलंदाजी खूप महागडी होत आहे हे पाहून नईब याने अन्य गोलंदाजांकडे चेंडू सोपविण्याची जरुरी होती. तसे न करता त्याने स्वत:कडेच गोलंदाजी ठेवली. त्यामुळे पाकिस्तानला खूपच फायदा झाला आणि तेथूनच सामना अफगाणिस्तानच्या हातातून निसटला.

स्पर्धेतील सर्वच लढतींमध्ये त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चुका खूप महागड्या ठरल्या. तसेच गोलंदाजांना पूरक क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना करण्यातही ते कमकुवतच दिसून आले. रशीद खान याने अनेक टी-20 सामने गाजविले आहेत. परंतु टी-20 सामन्यांपेक्षा एक दिवसीय सामन्याचे तंत्र वेगळे असते हे तो सपशेल विसरला. त्यामुळेच त्याच्यासारख्या नैपुण्यवान खेळाडून चाहत्यांना सपशेल निराश केले.

संघात कर्णधारपद व संघातील खेळाडूंची निवड करण्यावरून संघात मतभेद झाले होते. हे मतभेद ड्रेसिंगरुम किंवा खेळाडूंच्या निवासस्थानापुरतेच मर्यादित ठेवण्याची आवश्‍यकता होती. मात्र, त्यांनी भारतास दिलेल्या झुंजीपेक्षाही त्यांच्यात झालेली भांडणे व गोंधळ हा प्रसारमाध्यमांकरिता मुख्य विषय ठरला.

मोहम्मद नबीप्रमाणेच मुजीब उर रेहमान, इक्रम अलिखिल आदी खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी करीत आपल्याला उज्ज्वल भवितव्य आहे याची झलक दाखविली आहे. पुढच्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी त्यांना आतापासून संघबांधणीवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. झिम्बाब्वे, केनिया, स्कॉटलंड आदी छोट्या छोट्या संघांबरोबर स्पर्धात्मक सराव कसा करता येईल याचा विचार त्यांनी केला पाहिजे. त्याचप्रमाणे भारत, श्रीलंका, पाकिस्तानच्या दुसऱ्या फळीतील संघांबरोबरही सामने आयोजित करण्यासाठी त्यांनी संबंधित देशांच्या क्रिकेट मंडळांकडे व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे पाठपुरावा करण्याची नितांत गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)