नात्यांमध्ये सुधारणा करायची कला!

नातं विकसित व्हायला दोन्ही बाजूने काहीतरी मनातून ओतावं लागतं. ते फुलवावं लागतं. केवळ खूप प्रेम आहे, म्हणून कोणतंही नातं तरून जात नाही. त्यात शेअरिंगचा वाटा महत्त्वाचा असतो. एकमेकांशी जोडले जायचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे एकमेकांशी मनातलं बोलायची कला विकसित करणे. ही कला टप्प्याटप्प्याने विकसित होत असते. आता ठरवले मनातले बोलायचे आणि केले सुरू, इतकी सहजसाध्य नसते ती कला. नेमकं आणि मनमोकळं बोलता येणं एकदा जमू लागलं की दुसऱ्याशी कधी, कसा आणि किती संवाद साधावा, ह्याचाही ताळमेळ बरोबर जमतो आपल्याला. ह्या टप्प्यावर एकमेकांची सवय झाल्यानंतर जरासे हक्क गाजवणे सुरू होते. तेव्हा कोणी आपल्यासाठी प्रेमाने आणि नेमके असे काही केले, तर ते आनंदाने समजून घेऊन स्वीकारायला देखील एक वेगळी बुद्धिमत्ता आणि संवेदना विकसित व्हायला हवी असते. ती नाही झाली तर ते नाते दोन्ही बाजूने फसते. एकाला लादल्यासारखे वाटते. दुसऱ्याला आपला प्रेमळ हक्क नीट पोहोचतच नाही, ह्याची खंत खात राहते.

एकेकाळी दोन्हीकडून आपली मानलेली माणसे चांगुलपणातच जेव्हा आपल्याला काही सांगत असतात, बोलत असतात, तव्हा ते ऐकावे. नंतर आपण कितीही प्रयत्न केला तरी समोरच्याच्या मनात त्या स्थानी जाऊ शकत नाही. बोलावलं असताना गेलं नाही की बोलवावं असं आयुष्यभर वाटू शकतं. पण दुसऱ्याकडे आता ती जागाच तुमच्यासाठी उरलेली नसते. आजपासून आपला संबंध संपला, अशी अचानक तुटणारी नाती एकवेळ फार बरी असतात. पण मनात कचकच ठेवून त्याच लोकांशी अधूनमधून, कळत नकळत, मारून मुटकून, सहजच संपर्क ठेवून असणारी नाती इतकी सोपी नसतात.

कोणी वाट पाहात असताना, प्रेमाने बोलवत असताना त्या भावनेचा आदर करणे महत्त्वाचे. नंतर त्या वाटेच्या बंद दारावर कितीही धडका मारल्या तरी उपयोग नसतो. घ्या नां मला तुमच्यात, ही तर फारच जीव जाळणारी कचकच असते, स्वतःच्या आतली. वेळीच सुधरलेले बरे असते.

– प्राची पाठक 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)