पिंपरी – किरकोळ कारणावरून मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीला अवघ्या 24 तासांत जेरबंद करण्यात चिखली पोलिसांना यश आले. पोलीस नाईक नरहरी नाणेकर आणि होले यांनी दाखविलेली सतर्कता, तत्काळ करण्यात आलेली कार्यवाही आणि गुप्त खबऱ्याने दिलेली माहिती यामुळेच आरोपीला अटक करण्यात यश आले.
सनी मोहन घाटोळकर याचा खून करून मोन्या ऊर्फ प्रतिक संजय मोरे हा फरार झाला होता. चिखली पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेवून उपनिरीक्षक संदीप बागुल यांच्या नियंत्रणाखाली पथक बनवून हालचाली सुरू केल्या.
दरम्यान पोलीस नाईक नाणेकर आणि होले यांना आरोपी हा न्हावरे ता. शिरुर येथे येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. पथकाने सापळा रचून आरोपी सोन्या मोरे याला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनिष कल्यानकर, उपनिरीक्षक संदीप बागुल तपास पथकातील पो.हवा. राम साबळे, मंगेश गायकवाड, सुरेश जाधव, बाबा गर्जे, नरहरी नाणेकर, विपूल होले, पो. शिपाई संतोष सपकाह, सनील शिंदे, चेतन सावंत, अमोल साकोरे, कबीर पिंजारी यांनी केली. दरम्यान, आरोपी मोन्या मोरे याच्या घरावर मध्यरात्री दगडफेक करण्यात आली. खुनाचा राग धरून ही दगडफेक करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.