आचारसंहिता पथकाने पकडली सुगंधी तंबाखू

सोनईतील एकाला अटक ः दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर –
राज्य सरकारने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखुची नेवासे येथे अवैधरित्या वाहतूक निवडणूक आचारसंहिता पथकाने उधळून लावली आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी गोविंद सुभाषचंद्र लोया (वय 28, रा. सोनई, ता. नेवासे) याच्याविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून, त्याच्याकडून 59 हजार 423 रुपयांची सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. तंबाखू वाहतुकीसाठी वापरलेली 70 हजारांचे वाहन जप्त केले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता पथक नेमले आहेत. या पथकांकडून संशयरित्या फिरणाऱ्या वाहनांची तपासणी होत आहे. नेवासे येथे देखील पथक नेमले आहे. हे पथक नियमितपणे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना चारचाकी वाहन संशयास्पद फिरताना दिसते. पथकातील अधिकाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग करून ते थांबविले. वाहनातील चालक आणि तो वाहतूक करत असलेल्या गोण्यांची माहिती घेतली. वाहन चालक गोविंद लोया याला या गोण्यांमध्ये काय हे सांगता आले नाही. त्यामुळे संशय बळावला. गोण्यांची संपूर्ण तपासणी केल्यावर त्यात सुगंधी तंबाखुचे छोट्या-छोट्या पुड्या आढळल्या.

पथक प्रमुखांनी ही माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या नगर कार्यालयाला संपर्क साधून दिली. सहायक आयुक्त किशोर गोरे यांनी त्याची दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी यू. आर. सूर्यवंशी, ए. व्ही. बाचकर आणि नमुना सहायक पी. सी. कसबेकर या तिघांना घटनास्थळी पाठविले. दरम्यान, आचारसंहिता पथकाने वाहन, त्यातील मुद्देमाल आणि चालक या तिघांना सोनई पोलिसांना बोलावून ताब्यात दिले होते. अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी सुगंधी तंबाखुची तपासणी केल्यावर त्यात 59 हजार 423 रुपयांचा मुद्देमाल सापडला. सोनई पोलीस ठाण्यात गोविंद लोया याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)