वेळीच सावरणे आवश्यक

-डॉ. सागर मुंदडा

दारू पिणे, मद्यपान किंवा ड्रिंक घेणे यामध्ये तसा काही फार मोठा फरक आहे असे म्हणता येणार नाही. मद्य मग ते कोणतेही असो, परिणाम करतेच. अगदी मर्यादेत प्यायचे म्हटले, तरी ती मर्यादा कधी सुटू शकते. मर्यादेची लक्ष्मणरेषा कधी पार केली गेली हे समजतही नाही. मग त्याचे परिणाम व्हायचे ते होतातच.

मद्यपानाचं व्यसन हे मुळात वाईटच. दारू पिणाऱ्यांमध्येही दोन प्रकार असतात. मर्यादा सोडून अति प्रमाणात पिणारे आणि मर्यादेत राहून मद्यपान करणारे. पण प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांचाही अनेकदा तोल सुटतो कसा आणि कधी सुटला याचे भानही राहत नाही आणि ते भान सुटले की मग अति तिथे माती हे ठरलेलंच. म्हणूनच ही लक्षणं वेळेत ओळखणं गरजेचं आहे…

मद्यपान करणं ही आपल्याकडे हल्ली सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. काही प्रमाणात प्रतिष्ठेचंही बनलं आहे. प्रसंगविशेषी पार्टीमध्ये मद्यपान करणारे असतात. आठवड्यातून दोन-तीन वेळा मद्यपान करणारे असतात आणि काही लोक तर नित्यनियमाने अगदी रोज न चुकता मद्यपान करत असतात. कुठलंही व्यसन हे मुळात वाईटच. त्याचं समर्थन करता येणार नाही. आत्ता इथे आपण मुख्यत: दारूच्या व्यसनाचा विचार करू. मद्यपानाचं व्यसन असलेल्यांमध्ये दोन प्रकार असतात एक म्हणजे अति प्रमाणात दारू पिणारे आणि दुसरे म्हणजे एका मर्यादेत राहून दारू पिणारे. अति प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांना उपचारांची आवश्‍यकता असतेच. ते उपचार योग्य वेळेत मिळाले, तर त्या व्यक्तीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढता येतं.

ठरावीक प्रमाणात मर्यादशील मद्यपान करणाऱ्यांनाही काही वेळा उपचारांची गरज भासू शकते. कारण दारू ही गोष्टच अशी आहे की अनेकदा त्यांचा स्वत:वर ताबा राहात नाही. अशा वेळी मद्यपान जास्त होऊ शकतं. मर्यादेत दारू पिण्याच्या सवयीला ‘लो रिस्क पॅटर्न’ असंही म्हटलं जातं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अब्युज अँड अल्कोहोलिझम (एनआयएएए)च्या सर्वेक्षणानुसार, ‘लो रिस्क’ करणाऱ्या महिला दर आठवड्याला सात ड्रिंक्‍स तर एका बैठकीत तीन ड्रिंक्‍स घेतात, तर पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण जास्त आहे. ते दर आठवड्याला ड्रिंक्‍स आणि एका दिवशी चार ड्रिंक्‍स घेतात. प्रमाणामध्ये दारू पिणाऱ्यांचा स्वत:वरचा ताबा सुटतो. त्यांची काही लक्षणं इथे दिली आहेत. ती वेळीच ओळखता यायला हवीत.

ही लक्षणं पुढीलप्रमाणे…

-मद्यपान करायला सुरुवात केल्यावर पिण्यावर नियंत्रण नसणं.
-सतत मद्यपानाचे विचार मनात घोळत राहणं.
-मद्यपान केल्यावर वर्तणुकीत बदल होणं.
-चुकीच्या सवयी लागणं.
-अति प्रमाणात मद्यपान करणाऱ्या लोकांच्या वर्तुळात सतत वावरणं.
-पार्टीला जाण्याआधीच मद्यपान सुरू करणं.
-आजुबाजूचं भान न राहणं.
-मद्यपान करून गाडी चालवणं.
-कुठल्याही गोष्टीचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी मद्यपान करणं.
-दररोज काही ना काही कारण काढून दारू पिणं.
-स्वत:च्या मद्यपानाच्या सवयीविषयी स्वत:लाच दोष देत राहणं.
-काही काळासाठी मद्यपान करणं सोडायचं. पण नंतर पुन्हा जास्त प्रमाणात मद्यपानाला सुरुवात करणं.

जर वरीलपैकी एखाद-दोन लक्षणं जरी जाणवली, तरी त्वरित मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण वेळीच उपचार सुरू झाले तर त्या व्यक्तीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढणं शक्‍य होतं. त्यासाठी वेळीच सावरणे आवश्‍यक आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)