देशापेक्षा कुटुंब मोठे मानल्यानेच सशस्त्र दलांचे नुकसान – पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली – 2014 पूर्वीच्या सरकारांनी अक्षम्य निष्काळजी दाखवल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि सशस्त्र दलांचे मोठे नुकसान झाले, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. नवी दिल्लीत “इंडिया गेट’जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सशस्त्र दलातील आजी आणि माजी अधिकारी उपस्थित होते. “नव्या प्रथा आणि नवीन धोरणांच्या आधारे नवभारत जगभर आपली ओळख निर्माण करत आहे. त्या नवभारतात सशस्त्र दलानी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे.’ असे पंतप्रधान म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधानांनी याप्रसंगी राफेलबाबत कॉंग्रेसच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली. बोफोर्स आणि हेलिकॉप्टर खरेदीतील गैरव्यवहार एका कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचत असताना याच कुटुंबाकडून मात्र राफेलबाबत आरडाओरडा केला जात आहे. राफेल विमाने भारताच्या आकाशात भरारी घेऊ नयेत, म्हणून हेच लोक उतावीळ झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
देशातील पहिल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाची संकल्पना 1961 मधील आहे. मात्र या स्मारकाच्या उभारणीला पूर्वीच्या सरकारकडून झालेला उशीर म्हणजे शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांवरचा अन्याय आहे. केवळ एका कुटुंबाला देशापेक्षा अधिक महत्व दिले गेल्यामुळेच या युद्धस्मारकाला उशीर झाला, असे पंतप्रधान म्हणाले.

सशस्त्र दलांसाठीच्या युद्धसामुग्रीची खरेदी आणि सशस्त्र दलांच्या सक्षमीकरणाचे अनेक महत्वाचे निर्णय प्रलंबितच होते. मात्र आपल्या सरकारने हे निर्णय प्राधान्याने घेतले. सशस्त्र दलांसाठी सरकार लवकरच तीन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर शहिद झालेल्या जवानांचे स्मारक…
स्वातंत्र्यानंतर चीनविरोधात (1962), पाकिस्तानविरोधात (1947, 1965 आणि 1971), श्रीलंकेतील भारतीय शांतीसेनेची मोहिम आणि कारगिल (1999) युद्धात शहिद झालेल्या जवानांना या स्मारकाद्वारे मानवंदना देण्यात आली आहे. याशिवाय वेगवेगळ्या घटनांदरम्यान शहिद झालेल्या 25 हजार 942 जवानांची नावे या स्मारकावरील स्तंभांवर कोरली गेलेली आहेत. पहिल्या महायुद्धानंतर अफगाणिस्तान- वझिरीस्तानमधील संघर्षासह स्वातंत्र्यापूर्व काळातील शहिद झालेल्या जवानांचे स्मारक इंडियागेट इथे 1972 साली उभारण्यात आले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात शहिद झालेल्या जवानांचे स्मारक “त्याग चक्र’ या नावाने आज राष्ट्राला समर्पित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)