रायगडाच्या पायथ्याशी आरमाराचे म्युझियम- छत्रपती संभाजीराजे

किल्ले संवर्धनासाठी 600 कोटींचा आराखडा मंजूर

मुंबई: मुघल साम्राज्याशी लढा उभारुन हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे म्युझियम रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी उभारणार, अशी घोषणा रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज केली. तसेच रायगड किल्ल्याप्रमाणे इतर दहा किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारकडे 150 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

ही घोषणा मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी केली. येत्या सोमवारी, 11 फेब्रुवारीला रायगडावर एक दिवसाची दूर्ग परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात शिवप्रेमींच्या सुमारे 200 संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

रायगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी 600 कोटींचा आराखडा मंजूर झाला असून त्यातील 28 कोटींच्या कामाला सुरूवातही झाली आहे. या माध्यमातून रायगडावर पाय-या बांधण्याचे काम चालू आहे. महाड ते रायगड रस्त्यासाठी केंद्र सरकारने 113 कोटी रूपये मंजूर केले आहेत. तर रायगडाप्रमाणे पन्हाळगड, शिवनेरी, सिंधुदूर्ग, देवगिरी, भुजकोट आदी दहा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्रीय वित्त आयोगाकडे 150 कोटींची मागणी केली असून आयोगाने शंभर कोटी देण्याची तयारीही दाखविली आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.

88 एकर जमीन अधिग्रहित

रायगडावर बांधकाम करण्यास प्रतिबंध असल्यामुळे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली 88 एकर जमीन शासनाने अधिग्रहित केली आहे. या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावर आधारीत म्युझियम उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले. या जागेवर संग्रहालय तसेच पर्यटकांसाठी निवासाची व्यवस्था केली जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)