अर्जुन खोतकर कॉंग्रेसच्या वाटेवर? दानवेंविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्‍यता 

मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभ निवडणूकीसाठी अखेर युती जाहीर करण्यात आली. पण युती जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत बंड सुरू होत असल्याचे चित्र आहे. जालन्यातून शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांना कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. याबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार असून कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी लवकरच अंतिम निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.

जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे वैर सर्वश्रुत आहे. येत्या निवडणुकीत स्वबळाच्या नाऱ्यानंतर जालन्यात रावसाहेब दानवे यांना आस्मान दाखवू, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले होते. परंतु शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने त्यांची चांगलीच गोची झाली. युतीनंतर ही जागा भाजपला मिळणार आहे. तरीही दानवेंविरोधात निवडणूक लढवण्यावर खोतकर ठाम आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युती झाली तरीही मी शंभर टक्के जालन्यातून लढणार आणि विजयीच होणार असे म्हणत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला आहे. जालन्यात दानवे यांना पराभूत करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. हीच संधी साधून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अर्जुन खोतकर यांना पक्षात घेऊन जालन्यातून उमेदवारी देणार असल्याचे म्हटले जात आहे.

ठाकरेंच्या निर्णय अंतिम… 

शिवसेनेचे नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांना पुर्णविराम दिला आहे. कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्यांना काही अर्थ नाही. मी कुणालाही भेटलो नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे निर्णय घेतील तो अंतिम राहिल. मी ठाकरे घराण्याशी गद्दारी करणार नाही, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)