स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : 5 हजारांच मुद्देमाल जप्त
नगर: नगर-वांबोरी रत्यावरील वांबोरी घाटात दबा धरून दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने केली आहे.
सचिन पोपट सावंत (वय-35, रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) यांना नगर-वांबोरी-मार्गे ब्राह्मणी येथे जात होते. त्यावेळी वांबोरी घाटातील वळणावर रस्त्याचे कडेला दबा धरुन बसलेल्या अनोळखी 3 ते 4 आरोपींनी अडवून मारहाण केली. तसेच त्यांच्यावळील रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिणे, तसेच मोबाईल, असा एकूण 89 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून आरोपी गोरख राधाकिसन पाडेकर (वय-24, रा. रुपमातानगर, सावेडी. ता. नगर.) यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने त्याचा साथीदार बल्ली भाऊसाहेब साळवे, (रा. शिंगवे नाईक) व बल्ली साळवे याचे दोन अनोळखी साथीदार अशांनी मिळून गुन्हा केला असल्याचे सांगितले.
आरोपी बल्ली भाऊसाहेब साळवे याचा शोध घेताल. परंतु तो मिळून आला नाही. आरोपी गोरख पाडेकर याच्याकडे गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता, त्याने चोरलेल्या मालापैकी मोबाईल माझ्याकडे असून, उर्वरित रोख रक्कम व दागिने बल्ली साळवे व त्याच्या साथीदारांकडे असल्याचे सांगून गुन्ह्यातील चोरलेला 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून दिला. या पथकात रोहन खंडागळे, रवींद्र कर्डिले, भाऊसाहेब काळे, विशाल दळवी, अशोक गुंजाळ, संदीप चव्हाण, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, विजय ठोंबरे, मन्सूर सय्यद, चालक संभाजी कोतकर यांनी ही कारवाई केली.