पारधी समाजाचे शिरूरमध्ये अर्धनग्न आंदोलन

मांडवगण येथील विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

शिरूर – मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत व महसूल विभागाने शासनाची फसवणूक करून घोटाळा केल्याचा आरोप करीत याच्या निषेधार्थ पारधी समाजातर्फे शिरूर कार्यालयावर मोर्चा काढला. तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन व बोंबाबोंब आंदोलन केले.

शिरूर तहसील कार्यालयासमोर मांडवगण फराटा येथील हिरालाल रामा भोसले परिवारासह गेल्या अकरा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

मोर्चेकरांनी घोटाळा करणारे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या ठिय्या आंदोलनास आज पारधी समाजाच्या वतीने मोर्चा बोंबाबोंब, अर्धनग्न आंदोलन करून पाठिंबा दिला. दारिद्य्ररेषे खालील यादीमध्ये धनदांडग्या लोकांना समाविष्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. तर असे पन्नास कुटुंब आहे ज्यांची दारिद्रयरेषेखाली यादीमध्ये समाविष्ट करावे, मांडवगण फराटा ग्रामपंचायतीमध्ये इंदिरा आवास योजना, घरकुल योजना, अपंगांच्या योजना यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आला आहे. मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका यांनी नावे दारिद्रयरेषेमध्ये समाविष्ट केली व घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे. विविध योजनांमध्ये शासनाची फसवणूक केल्याने या प्रकरणाची चौकशी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

40 मागण्यांसाठी 11 दिवसांपासून हिरालाल रामा भोसले यांनी तहसीलसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, असे त्यांनी सांगितले. शिरुर शहरातील इंदिरा गांधी पुतळ्यास पुष्पहार घालून पारधी समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शिरूर तहसीलदार कार्यालय गेल्यावर पारधी समाजातील पुरुषांनी अर्धनग्न होऊन आंदोलन करून पारधी समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी बोंबाबोंब आंदोलनही केले. शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार यांना पारधी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आली. लवकरात लवकर मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)