अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती 

देवगड बंदरात शेकडो नौका आश्रयासाठी दाखल 
गुजरात, तामिळनाडू राज्यांतील नौकांचाही समावेश 
सिंधुदुर्ग: हवामान विभागाने समुद्रात चक्रीवादळाचा इशारा दिल्याने शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, तामिळनाडू राज्यांतील नौकांचाही समावेश आहे.
10 ऑक्‍टोबर दरम्यान समुद्रात चक्रीवादळ होणार असल्याचा हवामान विभागाचा संदेश मिळाल्यानंतर देवगड बंदरातील नौकामालकांनी समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या आपल्या नौकांना तत्काळ माघारी बोलविले. स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, तामिळनाडू राज्यांतील नौकाही देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये मिळालेल्या आकडेवारीनुसार, गुजरात व तामिळनाडूमधील 55 नौकांचा समावेश आहे.
दरम्यान, हवामान विभागाने इशारा दिलेले चक्रीवादळ समुद्रात 300 किमी अंतरातून जाणार आहे. त्यामुळे समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या वादळाचा शेवट गुजरात येथील कच्छ येथे 10 ऑक्‍टोबरला होणार आहे.त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याची माहिती मच्छीमार नेते भाई खोबरेकर यांनी दिली.
चक्रीवादळ हे 300 किमी बाहेरून जात असले तरी डिसेंबर 2017 मध्ये ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांनी धोका न पत्करता तात्काळ नौकांना माघारी बंदरात बोलविले आहे. सध्या देवगड बंदरातील बहुतांशी नौका मासळी मिळत नसल्यामुळे बंद स्थितीतच होत्या.मच्छीमारी हंगामाला सुरूवात झाल्यानंतर नौकांना म्हाकूळ मिळत होती. मात्र, ती मिळेनाशी झाल्यानंतर नौकामालकांनी उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने नौका बंद ठेवल्या होत्या.
न्हैयद्वारे मच्छीमारी करणाऱ्या नौकांना सुरमई तर कांडाळीद्वारे मच्छीमारी करणाऱ्या नौकांना सौंदाळे व बांगडा मिळत होता.मात्र, समुद्रात चक्रीवादळ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने या नौकाही शनिवारपासून समुद्रात मच्छीमारीसाठी गेल्या नाहीत. दोन दिवस खोल समुद्रातील मच्छीमारी बंद राहील व वातावरण निवळल्यानंतर मच्छीमारी सुरू होईल, असे भाई खोबरेकर यांनी सांगीतले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)