पुणे मेट्रो मार्गालगत वाढीव “एफएसआय’ ला मंजुरी

“टीओडी’ धोरणाला राज्य शासनाची अखेर मंजुरी


जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळणार


पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा

पुणे – सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांना चालना आणि पूरक विकास करण्यासाठी राज्य शासनाने पुणे महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा केली आहे. या अंतर्गत मेट्रो स्थानकाच्या 500 मीटर परिसरातील बांधकामांसाठी रस्त्यांची रुंदी आणि क्षेत्रफळानुसार 2 ते 4 एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) देण्यासाठी ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) चा समावेश करण्यात आला आहे. याचा लाभ “एचसीएमटीआर’ आणि “बीआरटी’लगतच्या बांधकामांनाही होणार असून जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. राज्य शासनाने दि.8 मार्चला यासंदर्भातील अध्यादेश काढला असून नागरिकांच्या हरकती आणि सूचनाही मागविल्या आहेत.

मेट्रो मार्गावर अधिकाअधिक प्रवासी संख्या उपलब्ध व्हावी, यासाठी मार्गालगत बांधकामांना अधिकचा “एफएसआय’ देण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला होता. यामुळे मेट्रो मार्गिकेच्या परिसरातील इमारतींची उंची वाढून पर्यायाने रहिवासी आणि व्यवसायानिमित्त नागरिकांची संख्या वाढेल, तसेच अतिरिक्त “एफएसआय’मुळे महापालिकेला प्रीमियमच्या माध्यमातून अधिकचे उत्पन्न मिळेल आणि मेट्रोच्या कामासाठी निधी उपलब्ध होईल, असा या मागील उद्देश होता. अखेर दोन वर्षांनी राज्य शासनाने या “टीओडी’ धोरणाला मंजुरी देताना अधिकच्या काही सुधारणाही केल्या आहेत.

“टीओडी’ मंजूर करताना राज्य शासनाने मेट्रो मार्गिकेऐवजी मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिघात “टीओडी’ झोन जाहीर केला आहे. परंतु, ज्या ठिकाणी मेट्रोच्या दोन स्थानकांमधील अंतर हे 1 कि.मी. आहे, त्या परिसरातील मार्गिकेच्या दोन्ही बाजूंच्या बांधकामांना याचा लाभ होणार आहे. “टीओडी झोन’ जाहीर करताना रस्त्याची रुंदी आणि विकसित करण्यात येणाऱ्या जागेचे क्षेत्रफळ यानुसार “एफएसआय’ निश्‍चित केला आहे.

“टीओडी’ झोनमध्ये येणाऱ्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यास यामुळे चालना मिळणार आहे. विशेषत: शहरातील जुने वाडे आणि मेट्रो मार्गीकेच्या कडेला असलेल्या 30 ते 40 वर्षे जुन्या इमारती आणि सोसायट्यांना “टीओडी’चा लाभ होणार आहे.

असे आहे जागा आणि “एफएसआय’चे प्रमाण
नवीन धोरणानुसार, 9 ते 12 मी. रुंद रस्ता आणि एक हजार चौ.मी.पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या जागेवरील बांधकामासाठी 2 “एफएसआय’, 12 ते 18 मी. रुंद रस्ता आणि एक हजार चौ.मी. पेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या जागेवरील बांधकामासाठी 2.5 “एफएसआय’, 18 ते 24 मी. रुंद रस्ता आणि 2 हजार चौ.मी.पेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या जागेवरील बांधकामासाठी 3 “एफएसआय’, 24 ते 30 मी. रुंद रस्ता आणि 3 हजार चौ.मी.पेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या जागेवरील बांधकामासाठी 3.5 “एफएसआय’ आणि 30 मी. व त्यावरील रुंदीच्या रस्त्यावरील 4 हजार चौ.मी.पेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या जागेवरील बांधकामासाठी 4 “एफएसआय’ अनुज्ञेय केला आहे.

…तर मोफत “एफएसआय’
मेट्रो स्थानकाच्या 200 मीटर परिसरात सार्वजनिक पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्यास यासाठी मोफत “एफएसआय’ देण्यात येणार असून उर्वरित बांधकामासाठीच्या एफएसआय प्रीमियममध्ये 40 टक्के सवलत देण्यात आली आहे. मेट्रो मार्गिकेच्या 20 मी. परिसरात बांधकाम करताना मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे “ना हरकत प्रमाणपत्र’ अनिवार्य असेल. मोठे होलसेल स्टोअर्स, वाहनांचे शोरूम आणि सर्व्हिस सेंटर्स, गॅरेजेस, गोदामांना “टीओडी’ झोनचे फायदे मिळणार नाहीत.

मेट्रो आणि एचसीएमटीआर प्रकल्प शहराच्या जवळपास सर्वच भागांतून जात आहेत. “टीओडी’ चा लाभ अधिकाअधिक मिळकतींना होणार असून पुढील काळात शहर उर्ध्व दिशेने (उंच इमारती) वाढणार आहे. टीओडी लागू करताना प्रीमियम एफएसआय वापरताना काही प्रमाणात “टीडीआर’ वापराचेही बंधन घालण्यात आले आहे. यामुळे विकास आराखड्यातील आरक्षणांचे “टीडीआर’च्या माध्यमातून भूसंपादन करण्यासही अधिकचा वाव मिळणार आहे. अधिकच्या एएसआय प्रीमियममुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार असून विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मदत मिळणार आहे.
– प्रशांत वाघमारे, नगर अभियंता, पुणे महापालिका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)