संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेच्या एका जागेसाठी (23 जून) रोजी होत असलेल्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 5 जणांनी 6 उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली.
यामध्ये राजेंद्र कारभारी वाकचौरे (कॉंग्रेस), कविता सुरेश तेजी (शिवसेना), कन्हैय्या गुलाब कागडे, कविता भिमराज गुंजाळ, आणि माजी नगरसेवक घनश्याम रमेश जेधे यांचा उमेदवारात समावेश आहे. शिवसेना शहरप्रमुखांच्या पत्नीसह एक माजी नगरसेवक आणि बॅंकेच्या माजी अध्यक्षांचा उमेदवारांमध्ये समावेश आहे. दरम्यान शिवसेना-भाजप युतीकडून कविता सुरेश तेजी यांची उमेदवारी निश्चित केल्याची घोषणा शिवसेनेचे संपर्कप्रमुख व आमदार हेमंत दराडे यांनी केली. कॉंग्रेसच्यावतीने संगमनेर मर्चंट बॅंकेचे संचालक राजेंद्र वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे तेजी आणि वाकचौरे यांच्यात सरळ लढत रंगणार आहे.
प्रभाग क्रमांक 10 (अ) मधून शिवसेनेकडून लखन सुधाकर घोरपडे निवडून गेले होते. मात्र घोरपडे यांना जात प्रमाणपत्राच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी घोरपडे यांना पदावर राहण्यास अपात्र ठरविले. त्यामुळे या रिक्त जागेसाठी 23 जूनला पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेकडून घोरपडे निवडून गेल्याने आणि या प्रभागातील बहुतांश भाग शिवसेनेला मानणारा असल्याने, यावेळी शिवसेनेकडून उमेदवारांची संख्या अधिक आहे.