मुंबई, दि. 13 – मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे विविध वयोगटांच्या प्रशिक्षकपदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून या नियुक्त प्रशिक्षकाने रणजी करंडक विजेतेपद मिळवून दाखवल्यास त्याला 12 लाख रुपयांचे अतिरिक्त इनाम देखील देण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
‘एमसीए’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, वरिष्ठ पुरुष संघांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधीत एक वर्षांचा असून त्याला 24 लाख रुपये मानधन दिले जाईल. याचप्रमाणे त्याने संघाला रणजी विजेतेपद मिळवून दिल्यास त्याला 12 लाख आणि उपविजेतेपद मिळाल्यास सहा लाखांचा बोनस मिळेल. याचप्रमाणे, पुरुषांच्या 23, 19 आणि 16 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकाला 15 रुपये मानधन देण्यात येईल. या संघांनी अनुक्रमे कर्नल सी. के. नायडू करंडक, कूचबिहार करंडक आणि विजय र्मचट जिंकल्यास साडेसात लाख आणि उपविजेतेपद मिळवल्यास पावणेतीन लाख रुपये बक्षीस दिले जाईल.
याशिवाय, 14 वर्षांखालील मुले, वरिष्ठ महिला आणि 19 वर्षांखालील महिला या गटांच्या प्रशिक्षकाला वार्षिक 12 लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. प्रशिक्षकपदासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन “एमसीए’कडून करण्यात आले आहेत. त्यानंतर क्रिकेट सुधारणा समिती मुलाखती घेऊन पदनियुक्ती प्रक्रिया पूर्ण करील. भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये राजू कुलकर्णी, किरण मोकाशी यांचा समावेश आहे.