‘आपला टाइम येणार आहे’

आजच्या व्हायरल व्हिडिओ कट्टयावर आज आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तरुणाईला भुरळ घालणाऱ्या मराठमोळ्या रॅप बद्दल. महिनाभरापूर्वी रणवीर आणि आलियाचा ‘गली बॉय’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सर्वत्र रॅप सॉंग्सचाच बोलबाला असल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात ‘गली बॉय’ चित्रपटातील ‘अपना टाइम आयेगा’ हे रॅप सॉंग तर सध्या ‘युथच अँथेमचं’ झाल्याचं सर्वत्र पाहायला मिळतंय. ‘गली बॉय’ चित्रपटातील ‘अपना टाइम आयेगा’ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या गाण्याचे मराठी व्हर्जन का नसावे? कदाचित असाच विचार करून उमेश खाडे या तरुणाने या हिंदी गाण्यामध्ये मराठी शब्दांची भेळमिसळ करत ‘आपला टाइम येणार आहे’ हे मराठी रॅप सॉंग अस्सल मराठमोळ्या लूकमध्येच सादर केले आहे.

हातात आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, पायात कोल्हापुरी चप्पल, डोक्‍यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी, अंगात पांढऱ्या रंगाचा कुर्ता अशा मराठमोळ्या लूकमध्ये उमेश “कोण बोलला, कोण बोलला, माझ्याकडून होणार नाय?” असं म्हणत गाण्यामध्ये एंट्री करतो. गाण्याचं शूटिंग गल्ल्या-बोळ्यांमध्ये केले असल्याने ओरिजनल ‘गली बॉयमधील’ ‘अपना टाइम आयेगा’ गाण्याचा गंध ‘आपला टाइम येणार आहे’ या मराठी रॅप व्हर्जनमध्ये देखील दरवाळताना दिसतो.

उमेश खाडे स्वतःच ‘आपला टाइम येणार आहे’ हा रॅप सादर करीत असून संपूर्ण व्हिडिओमध्ये तो फुल एनर्जी आणि कॉन्फिडन्सने रॅप करताना दिसतोय. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर कपडे विकणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या सामन्यांना चित्रित करण्यात आले असल्याने गाण्याचा व्हिडीओ अधिकच प्रभावी वाटतो आहे. मूळच्या गली बॉयमधील ‘अपना टाइम आयेगा’ या रॅप सॉंग प्रमाणेच ‘आपला टाइम येणार आहे’ या गाण्यामध्ये देखील सामान्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘आपला टाइम येणार आहे’ या गाण्याचे बोल देखील तितकेच प्रभावी असून हे गाणं पाहताना तुम्हाला नक्कीच आपण काहीतरी रिमेक केलेलं पाहतोय असं कदाचितही भासणार नाही. ‘आपला टाइम येणार आहे’ या रॅपला युट्युबवर चांगलाच प्रतिसाद मिळत असून या गाण्याला आतापर्यंत जवळपास 5.30 लाख हिट्‌स मिळाले आहेत.

– ऋषिकेश जंगम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)