अनुष्का शर्मा जेंव्हापासून ऍक्टिंगबरोबर प्रॉडक्शनमध्ये उतरली आहे, तेंव्हापासून तिच्याकडे बघण्याचा बॉलीवूडचा ऍप्रोचच बदलून गेला आहे. “झिरो’मध्ये शाहरुखबरोबर काम केलेल्या अनुष्काने इतक्यात कोणताच सिनेमा स्वीकारला नाही. पण ती स्वतःच्या प्रॉडक्शनसाठी काम करते आहे. गेल्या वर्षी तिच्या स्वतःच्याच प्रॉडक्शनखाली रिलीज झालेला हॉरर “परी’ आता तमिळमध्येही केला जाणार आहे, असे समजते आहे. त्याची तयारी दक्षिणेमध्ये जोरात सुरू झाली आहे.
मात्र खरी न्यूज तर पुढेच आहे. तमिळ “परी’मधील लीड रोल देखील अनुष्कानेच करावा, अशी तमिळ निर्मात्यांची अपेक्षा आहे. मात्र अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अनुष्काकडून या ऑफरला अद्याप होकार किंवा नकार काहीही कळवले गेलेले नाही. “परी’ने बॉलीवूडमध्ये हॉररपटांमधील हरवलेले चैतन्य पुन्हा निर्माण केले आहे. त्यात अनुष्काचा लुक जेंव्हा रिलीज झाला होता, तेंव्हा ही अनुष्काच आहे की अन्य कोणी आहे, असा प्रश्न पडला होता.
अनुष्काच्या चेहऱ्यावरचे निस्तेज भाव आणि हवेत फिरवलेले अधांतरी असलेले हात बघून या परीची कोणालाही भीतीच वाटली असणार. तोच तर या सिनेमाच हेतू होता. आता दक्षिणेतल्या प्रेक्षकांनाही घाबरवण्याचा उद्योग तमिळ “परी’च्या माध्यमातून करायचा आहे. अनुष्काबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट आणि अनुष्का या सेलिब्रिटी कपलला आता गोड बातमीची चाहुल लागली आहे, असे समजते आहे. अर्थात हा एक अंदाज आहे. यामध्ये अजून तरी काहीही ठोस हाती लागलेले नाही. विराट- अनुष्काच्या लग्नाला आता दीडवर्ष होऊन गेले आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन्सनाच ही बातमी ऐकण्याची घाई झालेली आहे. त्या बाळाचे आडनावही काही फॅन्सनी ठरवून ठेवले आहे “शर्मा-कोहली’.