नगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे

पुढच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात नागवडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

नगर: गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरू असलेला उमेदवाराचा शोध अखेर थांबला असून, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांची उमेदवारी आता निश्‍चित मानली जात आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागवडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता अन्य इच्छुकांच्या नावावर पडदा पडला आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा केला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडणार नसल्याचे पक्षाने जाहीर केले होते. त्यादृष्टीने प्रभावी उमेदवारांचा शोध गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघात लक्ष घातल्याने अनेक उमेदवारांची नावे चर्चेत होती. त्यात सुरूवातीला आमदार अरुण जगताप यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाले होते. परंतु त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर माजी आमदार नरेंद्र घुले, दादा कळमकर, ऍड. प्रतापराव ढाकणे यांची नावे चर्चेत आली. अर्थात या तिघांनी उमेदवारी पक्षाकडे मागतली होती. जानेवारी महिन्यात माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांचे नाव चर्चेत आले. डॉ. निमसे हे उमेदवार निश्‍चित असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी त्यादृष्टीने तयारी देखील सुरू केली. परंतु शरद पवार यांचा उमेदवारीचा शोध सुरू होता.

एकीकडे राष्ट्रवादीने हा मतदारसंघ न सोडण्याची भूमिका घेऊन उमेदवाराचा शोध सुरू ठेवला होता, तर दुसरीकडे हा मतदारसंघ कॉंग्रेसलाच सोडला जाईल, या अपेक्षेने विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी जोरदार मोर्चोबांधणी सुरू केली आहे. अर्थात लोकसभेची निवडणूक लढणारच, असा चंग बांधलेल्या डॉ. विखे यांनी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडला नाही, तर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निश्‍चय त्यांनी व्यक्‍त केला आहे. अर्थात ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार की भाजपचे चिन्ह घेऊन लोकसभा लढविणार, हा काळ ठरविणार आहे. परंतु सध्या तरी राष्ट्रवादी हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडणार नाही, हे आता नक्की झाले आहे.

घुले, कळमकर, ऍड. ढाकणे व डॉ. निमसे यांची नावे आता मागे पडली असून, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नाव पुढे आले आहे. अर्थात अनुराधा नागवडे यांचे नाव विधानसभेसाठी चर्चेत होते. त्या देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु राष्ट्रवादीच्या नरजेत त्या आता लोकसभेसाठी उमेदवार होऊ शकतात. हे आल्याने त्यांना लोकसभेसाठी गळ घालण्यात आली आहे. महिला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असले, तरी त्या प्रभावी वक्‍त्या व अभ्यासू आहेत. त्याबरोबर केवळ श्रीगोंदा तालुक्‍यात नागवडेंचे वर्चस्व नाही, तर दक्षिणेतील बहुतांशी तालुक्‍यात त्यांचा गोतावळा मोठा आहे. त्यामुळे लोकसभेसाठी अनुराधा याचे नाव आता निश्‍चित मानले जात असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागवडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पवार कुटुंबिय पाठिशी राहतील

गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची कोंडी करून शरद पवार यांनी राहुल जगताप यांना आमदार केले. तालुक्‍यातील सर्व गट एका छताखाली आणून पाचपुतेंना सळो की पळो करून सोडले होते. त्यानंतर स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर नागवडे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार आले असता त्यांनी यापुढे पवार कुटुंबिय नागवडेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार नागवडेंना लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांना खासदार करण्याच्या दृष्टीने आता पवार ताकदीने उभा राहणार असल्याचे दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)