आणखी 931 गावांत दुष्काळ जाहीर

मुंबई: राज्यातील 151 तालुक्‍यात यापूर्वीच मध्यम आणि गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहिर केला असतानाच अजून 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील 50 मंडळातील 931 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या गावांमध्ये तातडीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, असे उपसमितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावा आज मदत व पुनर्वसन मंत्री तथा यासंबंधी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाणी टंचाई असलेल्या राज्यातील आणखी काही गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. त्यामुळे ज्या मंडळामधील गावांमधील आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे व कमी पर्जन्यमान आहे, अशा गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

कर्जवसूलीला स्थगिती
यापूर्वी जाहीर केलेल्या गावांमध्ये दुष्काळ निवारण उपाय योजनांची अंमलबजावणी सुरू झाल्याचे सांगून पाटील म्हणाले, दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळातील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून कर्ज वसुलीलाही स्थगिती देण्यात आली आहे. तसेच बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची थकित वीजबील भरून त्या योजना सुरू करण्यात येत आहेत. दुष्काळी परिस्थिती पाहता रोजगार हमी योजनेमध्ये 100 दिवसांऐवजी 150 दिवस मजुरी देण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे 350 दिवस मजुरी देण्याचा राज्य शासन विचार करत आहे.

परीक्षा शुल्कमाफी
दुष्काळ असलेल्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहेत. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी घेण्यात आलेले परीक्षा शुल्क जानेवारी अखेपर्यंत परत करण्यास संबंधित विद्यापीठांना सूचना केल्या आहेत. चारा उत्पादन वाढवावे, यासाठी गोरक्षण संस्थांनाही नाममात्र दरात गाळपेर जमिनी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)