टिपण : घोषणा आणि वस्तुस्थितीतील विसंगती 

शेखर कानेटकर 

जीएसटीचे संकलन मागील डिसेंबर महिन्यात घटले आहे. पुनर्गुंतवणुकीचे व प्रत्यक्ष करांचे उद्दिष्ट्यही पूर्ण झालेले नाही. तरिही केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटलींकडून आर्थिक “भारत आर्थिक महासत्ता’ होण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. देशापुढे गंभीर आर्थिक समस्या असताना राममंदिरासारखे मुद्दे आणि निवडणुका जिंकण्याची रणनीती आखली जात असेल, तर ते दुर्दैवच म्हटले पाहिजे. 

देशाने आता निवडणूक वर्षात पदार्पण केले आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे उद्योग सुरू होतील. पाच वर्षापूर्वी आपण काय आश्‍वासने दिली होती, हे बहुतेकजण विसरून जातात. गेल्या पाच वर्षात आपण प्रत्यक्षात काय केले हे सांगण्यासारखे नसल्याने नवी प्रलोभने काय दाखवायची याचा विचार करत असतात किंवा वस्तुस्थितीला सोडून आकडेवारीचे फुगवलेले आकडे लोकांसमोर ठेवत असतात. विद्यमान सत्ताधारी तर त्यात वाक्‌बगार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2014 च्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्‍वासन दिले होते. नोटबंदीच्या फटक्‍याने नवे रोजगार निर्माण होणे सोडा, आहेत ते रोजगारही मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. पण सरकार ते मान्य करण्याऐवजी नोटबंदीचे अजूनही समर्थनच करीत आहे, याचे आश्‍चर्य वाटते. “सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) या प्रतिष्ठित व विश्‍वासू संस्थेने नुकताच जो ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्याने सरकारचे दावे फोल ठरले आहेत. देशात रोजगार निर्माण होण्यापेक्षा ते मोठ्या प्रमाणात उलट कमी होत आहेत, असे हा अहवाल म्हणतो.

डिसेंबर 2017 मध्ये संपूर्ण देशात 40 कोटी 79 लाख नोकऱ्या होत्या. तर डिसेंबर 2018 मध्ये ही संख्या 39 कोटी 70 लाखांवर आली आहे. याचा अर्थ गेल्या वर्षी (2018) नवे रोजगार निर्माण होण्याऐवजी 1 कोटी 9 लाख नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. बेरोजगारीचे हे भीषण वास्तव धक्‍कादायक आहे.

बेरोजगारीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला असून तेथे 91 लाख लोकांनी रोजगार गमावला आहे तर शहरीभागात 19 लाख जण रोजगाराला मुकले आहेत, असे हा अहवाल म्हणतो. ज्या 1 कोटी 9 लाख जणांनी गेल्या वर्षात नोकऱ्या गमावल्या त्यात तब्बल 65 लाख महिलांचा समावेश असल्याचे सीएमआयईने म्हटले आहे. बांधकाम मजूर, शेतमजूर व मोलमजुरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण नव्या बेरोजगारामध्ये जास्त आहे. रोजगारहानीचे सर्वाधिक प्रमाण (84 टक्के) ग्रामीण भागात असल्याचे हा अहवाल सांगतो. जे नियमित पगारदार नोकर आहेत, अशा 37 लाख लोकांनाही घरी बसायची वेळ आली आहे. रोजगाराच्या आघाडीवर ही दारुण अवस्था असताना गुंतवणुकीच्या आघाडीवरील परिस्थिती चिंता वाटावी, अशीच आहे. सीएमआयई या संस्थेनेच दिलेल्या अहवालानुसार, ऑक्‍क्‍टोबर ते डिसेंबर 2018 या नुकत्याच संपलेल्या आर्थिक तिमाहित, केवळ एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा झाली आहे. गेल्या 14 वर्षांतील हा नीचांक आहे.

दुसऱ्या आर्थिक तिमाहीच्या तुलनेत, गेल्या तिसऱ्या तिमाहीच्या काळात खासगी गुंतवणुकीतही तब्बल 62 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचेही समोर आले आहे. सार्वजनिक प्रकल्पांतील गुंतवणुकीतही 37 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. उत्पादन व ऊर्जा प्रकल्पांचे कामही मोठ्या प्रमाणात रखडले आहे. उत्पादन (कारखाने) क्षेत्रात 29 टक्के प्रकल्प रखडल्याने नव्या गुंतवणुकीला उद्योजकांकडून ब्रेक लावला गेला आहे. दुष्काळ, मागणीतील घट, बुडीत कर्जे, धोरणांमधील अनिश्‍चितता आणि प्रकल्पासाठी भूसंपादनात येत असलेले अडथळे हे नव्या गुंतवणुकीतील अडसर ठरताना दिसत आहेत. गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी 92 देशांचे दौरे केले. त्यावर 2021 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावर टीका सुरू होताच, मोदी समर्थकांनी, या दौऱ्यांतून मोदींनी लक्षावधी कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक आणल्याचा दावा केला. पण या लाखो कोटी रुपयांचे प्रतिबिंब कुठेही दिसत नाही. उलट आहे ती गुंतवणूकच आटत चालली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुंतवणुकीबाबतचे मोठमोठे दावे केले. पण रोजगार वाढण्याऐवजी घटतानाच दिसतो आहे.

अशी सर्व निराशाजनक परिस्थिती असतानाही केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली अजूनही भारतीय अर्थव्यवस्थेचे गुलाबी चित्र रंगवताना दिसत आहेत, याचे आश्‍चर्य वाटते. वकिली पाण्डित्यात ते तरबेज असले तरी, ती एक आत्मवंचनाच आहे, हे त्यांना कसे उमगत नाही, हा प्रश्‍नच आहे. असे अर्थमंत्री वस्तुस्थिती किती दिवस लपवून ठेवणार आहेत? नोटबंदी, जीएसटीनंतरही करदात्यांची संख्या वाढल्याचं ते सांगतात, पण करसंकलन किती झाले, हे मात्र सांगत नाहीत. कोंबडं कितीही झाकलं, तरी सूर्य उगवायचा थांबतो थोडाच?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)