वैद्यकीय प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

12 जुलै रोजी पहिली प्रवेश फेरी : सीईटी सेलकडून स्पष्ट
पुणे – एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शनिवारी राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार पहिली प्रवेश फेरी 12 जुलै रोजी होणार असल्याचे राज्य सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले.

एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या सुधारित वेळापत्रकानुसार स्टेट मिरीट लिस्ट दि. 7 जुलै रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर 7 ते 11 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पसंतीक्रम निवडावे लागेल. त्यानंतर पहिली प्रवेशाची निवड यादी 12 जुलै रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दि. 19 जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे आवश्‍यक आहे.

या वैद्यकीय अभ्यासक्रमाचे वर्ग 1 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे राज्य सीईटी सेलचे आयुक्‍त आनंद रायते यांनी सांगितले आहे. तसेच, बीएएमस, बीएचएमस, बीयूएमएस, बीएस्सी नर्सिग या अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे रायते यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्य सीईटी सेलतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणीचे काम आज पूर्ण झाले.

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून सुमारे 3 हजार 300 विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून घेतल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले. वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणीसाठी 6 जुलैपर्यंत मुदत होती. ही मुदत आज संपली. पुणे व परिसरातील विद्यार्थ्यांना बी. जे. मेडिकल महाविद्यालय व राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालय या दोन ठिकाणी कागदपत्र पडताळणी करण्याची केंद्र निश्‍चित करण्यात आले होते.

दरम्यान, विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पडताळणी महाविद्यालयाने केली. दररोज सुमारे 300 विद्यार्थी कागदपत्रांच्या तपासणीसाठी येत होते. नियोजित वेळापत्रकानुसार सुमारे 3 हजार 300 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. अरुण कोवळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)